पुण्यात भीषण अपघात; मद्यधुंद कार चालकाची 5 वाहनांना धडक
पुणे : पुण्यातील छत्रपती शिवाजी रस्त्यावर मद्यधुंद मोटारचालकाने मंगळवारी रात्री एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी कारचालकाचा पाठलाग करून त्याला शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात पकडले. चतु:शृंगी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दयानंद केदारी असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. छत्रपती शिवाजी रस्त्यावर प्यासा हॉटेलसमोर केदारीने एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती. अपघातानंतर तो पसार झाला होता. त्यावेळी त्याने एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांना धडक दिली. दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, तो शिवाजीनगर भागातून दीपबंगला चौकात गेला. दुचाकीस्वाराने त्याला पाठलाग करुन पकडले. त्याने या घटनेची माहिती त्वरीत चतु:शृंगी पोलिसांन दिली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कायदेशीर कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
कारचालक केदारी एका उपाहारगृहात व्यवस्थापक आहे. तो दारुच्या नशेत मोटार चालवित होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती खडक पोलिसांनी दिली.
हे सुद्धा वाचा : लोणी काळभोर हादरलं! शेतकऱ्याच्या डोक्यात घातला कोयता; शेतातील मजुरांवरही दगडफेक
पुणे पोलीस ‘अॅक्शन मोडवर’
बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.
महिला पोलिसाला कारने उडवले
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.