
दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना
नाशिक : चांदवड तालुक्यातील दिघवद रोकडोबा वस्ती येथे बुधवारी (दि. २६) सकाळी एका दुर्दैवी घटनेत वडील आणि त्यांची नऊ वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या पत्नीने सासू-सासऱ्यांनी मानसिक छळ करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिघवद रोकडोबा वस्ती येथे राहणारे दौलत उर्फ सचिन रामभाऊ हिरे (वय ३५, दिघवद ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी) यांनी त्यांची मुलगी प्रज्ञा दौलत हिरे (वय ९) आणि मुलगा प्रज्वल दौलत हिरे (वय ५) या दोघांना घेऊन बुधवार (दि. २६) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोरील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, दौलत हिरे यांनी दोन्ही लहानग्या मुलांचा हात धरून विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि जलतरणपटू ऑक्सिजन पथकाच्या मदतीने तिघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला.
भांडणानंतर विहिरीत घेतली उडी
या तिघांच्या मृत्यूबाबत दौलत उर्फ सचिन रामभाऊ हिरे यांच्या पत्नी सोनाली दौलत हिरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सोनाली हिरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सासू-सासरे रामभाऊ भाऊराव हिरे आणि मीना रामभाऊ हिरे हे लग्नापासून (सप्टेंबर २०१४) घरातील कामावरून दौलत याना वारंवार तू माजला आहे, आमचे ऐकत नाही, बायकोचा बैल झाला आहेस, असे बोलून मानसिक छळ करत होते.
कुटुंबियांमध्ये झाले होते भांडण
बुधवारी (दि. २६) सकाळी ७ वाजता गव्हाला पाणी देण्याच्या कामावरून दौलत आणि त्यांचे वडील रामभाऊ व आई मीना यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणामुळे दौलत उर्फ सचिन यांनी आपल्या दोन्ही मुलांसह विहिरीत उडी मारून जीवन संपवले. पत्नी सोनाली हिरे यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांनी सासू मीना रामभाऊ हिरे आणि सासरे रामभाऊ भाऊराव हिरे यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : पाथर्डी तालुक्यात एकाच दिवसात 4 आत्महत्या! परिसरात भीतीचे वातावरण, नेमकं घडलं काय?