crime (फोटो सौजन्य: social media)
बुलढाणा : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे सावकारीच्या वादातून एका तरुणाचा कोयत्याने वार करून भरचौकात खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.23) मेरा खुर्द फाटा येथे दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भरत विर्शिद (वय 40, रा. नांद्राकोळी, ता. जि. बुलढाणा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरुड येथील ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (वय 25 रा. वरुड, ता. जाफ्राबाद, जि. जालना) याने भरतला 10 लाख रुपये सावकारीवर दिले होते. मात्र, या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादातूनच ज्ञानेश्वरने भरतच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात भरत गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : पतीने चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; मृतदेह गाठोड्यात झाकला अन्…
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रूपेश शक्करगे आणि कर्मचारी भरत पोफळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असून, ही हत्या सावकारीच्या पैशातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मेरा खुर्द आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पुढील तपास अंढेरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रूपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेदेखील वाचा : तासाभरात वडील आणि मुलाचा मृत्यू! विजेचा धक्का बसल्याने मुलाचा मृत्यू, बातमी ऐकून घरी परतणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू