
धक्कादायक ! अपहरणानंतर 'त्या' व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह
अजिंठा : बोदवड येथील भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. शनिवारी (दि.२७) रात्रीपासून बेपत्ता असलेल्या तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह सोमवारी रोजी पहाटे चाळीसगाव घाटात आढळून आला. दरम्यान, आरोपींनी मृतक व्यापाऱ्याच्या मुलाकडे मोबाईलवर एक कोटीची खंडणी मागितली होती. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
बोदवड येथील कृषी सेवा केंद्र चालवणारे तुकाराम गव्हाणे हे शनिवारी दुपारी आपल्या दुचाकीवरून (एम. एच. २० जि. ए. ०४४३) उंडणगाव येथे आले होते. तेथील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन ते घराकडे परतण्यासाठी निघाले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचले नाही. कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यांचा शोध घेतला मात्र शोध लागला नाही.
हेदेखील वाचा : Crime News : वर्षभरामध्ये ६५ गुन्ह्यात १२७ जेरबंद; ९३ लाखांचा अमलीपदार्थ साठा जप्त; शहर पोलिसांची मोठी कारवाई
दरम्यान, दुसऱ्या दिवशी तुकाराम गव्हाणे यांचा मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला. ‘माझे अपहरण झाले असून, बसस्थानक परिसरात एक कोटी रुपये घेऊन ये’, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने पुन्हा फोनवरून दोन कोटीची मागणी करण्यात आली. या धक्कादायक फोनमुळे अपहरणाचा संशय बाळगला आणि कुटुंबीयांनी तातडीने अजिंठा पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गंभीर्याने अजिंठा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलिस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह वडोदबाजार पोलिस आणि गुन्हे शाखेचे तीन पथकांनी तपास सुरू केला.
सोमवारी पहाटे आढळळा मृतदेह
सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या लोकेशनच्या मदतीने तपास शोध घेत असता सोमवारी (दि.२९) पहाटे चाळीसगावच्या घाटात त्यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून या खूनप्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी पाच जणांना विविध गावातून ताब्यात घेतले आहे. अजिनाथ उर्फ रखमाजी सपकाळ (वय २२, रा. पालोद), वैभव समाधान रानगोते (वय २२, रा. गोळेगाव), सचिन नारायण बनकर (वय २५, रा. गोळेगाव), विशाल साहेबराव खरात (वय २३, रा. पानवडोद), दिपक कन्हैयालाल जाधव (वय २५, रा. लिहा खेडी) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे यांचे अपहरण करून खंडणीसाठी खून करण्यात आला. पाचही आरोपींनी खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गव्हाणे यांचा मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिला होता. परंतु, अजिंठा, वडोदबाजार पोलिसांनी अचूक तपास करून संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
आमदार अब्दुल सत्तार यांची भेट
तुकाराम गव्हाणे यांचे अपहरण करून निर्दयीपणे हत्या केल्याच्या घटनेनंतर माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी बोदवड येथे गव्हाणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन तीव्र संवेदना व्यक्त केल्या. याप्रकरणी दोन दिवसांपासून आपण स्थानिक पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेऊन होतो. घडलेली घटना निंदनीय असून, आरोपीना कठोर शासन व्हावे करावे, अशी मागणी त्यांनी केली.