पैसे देण्यास नकार देणार्या एकावर ब्लेडने वार; पुणे स्टेशन परिसरातील घटना
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांनी दहशत माजविली असून, पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. स्टेशन परिसरात आठवडभरात लुटमारीच्या तीन घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत वडिथा गोविंदा नाईक (वय २८, रा. बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरातून निघाले होते. त्यावेळी या भागात एकाने त्यांना अडवून पैशांची मागणी केली. नाईक यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या खिशातील ८०० रुपये काढून घेतले. त्यांनी चोरट्याला विरोध केला. चोरट्याने त्यांच्यावर ब्लेडने वार केले. नाईक यांनी आरडाओरडा केल्यानंतर चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार नाईक तपास करत आहेत.
पुणे स्टेशन परिसरात चोरट्यांनी गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तरुणाच्या चेहऱ्यावर लावून त्याच्याकडील ४३ हजारांची रोकड चोरून नेली होती. चार दिवसांपूर्वी स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि साथीदारांनी चाकणमधील तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांचा वावर असतो. या भागात प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील रोकड, तसेच मोबाइल चोरुन नेल्या जातात.
हे सुद्धा वाचा : पुण्यात भरधाव ट्रकने दुचाकीला दिली धडक; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.