
गतिमंद विद्यार्थ्याला शाळेत शिपायाकडून बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : गतिमंद विद्यालयात माजी विद्यार्थ्याला शाळेच्या शिपायाने लोखंडी तव्याने मारहाण केल्याचा आणि अन्य एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना २६ जून ते २९ ऑक्टोबर दरम्यान मांडकी (गोपाळपूर) येथील चैत्यन्य कानीफनाथ निवासी गतिमंद विद्यालयात घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतिमंद विद्यार्थ्याला मारहाण करणारा शिपाई दीपक गोविंद इंगळे (रा. गोपाळपुर, मांडकी) आणि काळजीवाहक प्रदिप वामन देहाडे (रा. केहऱ्हाळ ता. सिल्लोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब आरावट यांनी चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित शिपाई आणि काळजीवाहकाला तात्काळ निलंबित करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष सखाराम सुभानराव पोळ (वय ६०, रा. कैलासनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी सखाराम पोळ हे २००० पासून या शाळेचे अध्यक्ष आहेत. शाळेत ६ ते १८ वयोगटातील सुमारे ५० गतिमंद मुले निवासी राहून शिक्षण घेतात. शाळा अर्धअनुदानित असून २६ कर्मचारी कार्यरत आहेत. सुरक्षेसाठी शाळेत २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात मुख्याध्यापक राहुल पोळ यांना बोलावण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये शिपाई दिपक इंगळे हा एका गतिमंद विद्यार्थ्याला लोखंडी तव्याने मारहाण करताना दिसला. चौकशीत समजले की, तो विद्यार्थी शाळेचा माजी विद्यार्थी असून, घटना तीन वर्षांपूर्वीची असल्याची शक्यता आहे. त्यावेळी घटनेचे साक्षीदार म्हणून शाळेतील कर्मचारी सरोज पाटील, विठ्ठल गोंगे आणि कामाजी पाईकराव हेही कॅमेऱ्यात दिसतात. प्रकरण गंभीर असल्याने संस्थेने शिपाई इंगळे याला तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे.
विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण
याच शाळेत यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. शाळेतील अन्य एका गतिमंद विद्यार्थ्याच्या पालकांनी मुलाला मारहाण झाल्याची तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही तपासात काळजीवाहक प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे समोर आले होते. त्यालाही निलंबित करण्यात आले आहे.
मतिमंद विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या सलग दोन घटनांमुळे मतिमंद विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जिल्हा प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे, असा सवाल सामन्य करीत आहेत. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक रविकिरण दारवाडे करीत आहेत.