
अकोला जिल्हा परिषदेत एसीबीचा दणका! (Photo Credit - AI)
नेमके प्रकरण काय?
तक्रारदाराने १३ जून रोजी आंतरजातीय विवाह केला होता. शासनाच्या नियमानुसार अशा जोडप्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. या अनुदानासाठी तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी सर्व कागदपत्रांसह जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे रितसर अर्ज केला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाली नव्हती.
५ हजारांची मागणी, ३ हजारांवर तडजोड
तक्रारदार जेव्हा समाजकल्याण विभागात विचारपूस करण्यासाठी गेले, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या शैलेंद्र तुळशीराम बगाटे (४३, रा. कैलास टेकडी) या एजंटने हे काम करून देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने अकोला एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी केली असता, बगाटे याने पहिल्या टप्प्यात ३ हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उरलेले २ हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
एसीबीचा सापळा आणि अटक
बुधवारी दुपारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शैलेंद्र बगाटे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई एसीबीचे एसपी बापू बांगर, एएसपी सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी मिलिंदकुमार बहाकर, पोलीस निरीक्षक वेरूळकर, शुद्धोधन इंगळे, राहुल इंगळे, डिगांबर जाधव, अविनाश पाचपोर आणि सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.