चाकूचा धाक दाखवत महिलेला विवस्त्र करून शारीरिक अत्याचार
नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत चोऱ्या, घरफोडी, चैन स्नॅचिंग, हत्या, लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणे, अशा गुन्ह्यांबाबत बातमी आपण पाहिली आहे. मात्र आता नुकत्याच घडलेल्या या गुन्ह्यामुळे, महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. अज्ञात इसमाने एका महिलेच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलाही घरी एकटाच एकटी असताना रात्रीच्या सुमारास अत्याचार केल्याची ही घटना घडली आहे.
पीडिता या रबाळे पोलीस ठाणे हद्दीत राहतात, फिर्यादी या घरी एकट्याच झोपले असताना, रात्री दोन वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने त्यांच्या टॉयलेटच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. व बाथरूमचा दरवाज्याचा खालचा भाग तोडून घरात प्रवेश केला, व फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून विवस्त्र करत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला, व मुख्य दरवाजा वाटे बाहेरून कडी लावून पळून गेला. या घटनेबाबत फिर्यादी यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञात इसमाविरोधात बीएनएस च्या 64 (1), 331 (5), 127 (2), 352 यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 1 करत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखा कक्ष एकने घनसोली परिसरातून अटक केली आहे.
या घटनेमुळे शहरातील महिलांमध्ये विशेषता एकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरच्या आरोपीने केलेले कृत्य हे घृणास्पद असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नवी मुंबईतील नागरिक करत आहेत.
नवी मुंबई येथून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे सिडकोच्या एका अधिकाऱ्याला ६ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जमिनीचा लिलाव झाल्यानंतर जमिनीचा अहवाल सादर करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली. या प्रकरणात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिडकोचे उपअधीक्षक भूमी अभिलेख दिलीप बागुळे यांच्यासह दोघांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांकडून ९ लाख रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे सिडकोमध्ये खळबळ उडाली आहे आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल. नैना परिसरातील एका जमिनीच्या लिलावासाठी तक्रारदारांनी सिडकोकडे अर्ज केला होता.






