सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन विवाहीत महिला टोकाचं पाऊल उचलतांना दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक महिलांनी आत्महत्या केली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील फुरसूंगीत पती व सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात तिने फॅनला ओढणीने गळफास लावून जीवन संपवले आहे.
सीमा अक्षय राखपसरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि खलसे (वय ५०) यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा व अक्षय यांचा काहीच महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर सीमा पती अक्षय व सासरच्या मंडळीसोबत फुरसूंगीतील राचंदवाडी येथे राहत होते. यादरम्यान, सीमाला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. तसेच, तिला टोचून बोलून व शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून ६ ऑगस्ट रोजी सीमा हिने राहत्या घरात फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या
ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री वसतिगृहातील एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती कृष्णकुमार मीना (वय २३, रा. राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्योतीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये, मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाही. मला माफ करा. असा आई-वडिलांना उद्देशून माफी मागणारा मजकूर लिहिला आहे. दरम्यान तिचा भाऊ राजस्थान येथून पुण्यात आला आहे. त्याच्या माहितीनुसार, ज्योतीवर मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरू होती, औषध-गोळ्या देखील सुरू होत्या. विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती. काही दिवसांपूर्वी तिने टक्कलही केल्याची माहिती समोर आली आहे.