शेती विकली नाही म्हणून केला आईचा खून; लातूरच्या सांगवीतील खळबळजनक घटना
लातूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. राज्यातील वेगवेगऴ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता लातूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहरे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमीन विक्रीच्या वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुमिंद्रबाई जाधव (वय 70) यांच्या नावे असलेली शेती विकावी, असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधव (वय 48) मागील काही दिवसांपासून धरत होता. मात्र आईने ठाम नकार दिल्याने रागाच्या भरात काकासाहेबने 7 ऑगस्ट रोजी शेतातच आईचा तोंड दाबून आणि गळा आवळून आईचा खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला. सदर घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांचा तपास सुरू झाला.
आई आणि मुलांमध्ये शेतजमीन विकण्यावरून वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलगा काका साहेबचा शोध सुरू झाला. मात्र काकासाहेबचा तपास लागला नाही. रेणापूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत काकासाहेब जाधवचा मृतदेह आढळून आला. मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, रेणापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
लहान मुलांसमोरच पतीनं केली पत्नीची हत्या
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (५ ऑगस्ट) रात्री खराबवाडी, ता. खेड येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन रामआसरे यादव (२३, अलाहाबाद, उत्तरप्रदेश, सध्या चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन हा त्याची पत्नी गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता. यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भांडण केले आणि सायंकाळी पत्नीला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी बेलणे, पीव्हीसी पाईप आणि काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर मारहाण केली. तसेच पत्नीच्या पोटाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले. जेव्हा मयताचा मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.