विषारी अन्न दिल्याने कामगाराचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीतील आकार टुल्स लिमिटेड (प्लॉट नं. ई ५) या कंपनीत कामगाराचा मृत्यू झाला. विषारी अन्न खायला दिल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप सध्या केला जात आहे. त्यानंतर या कामगाराचा मृतदेह कंपनीत ठेवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मृत कामगाराच्या सहकाऱ्याने विषारी पदार्थ मिसळलेले अन्न खायला दिल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीकडून केला जात आहे.
मृत कामगाराचे नाव बॅरिस्टर हिरालाल यादव (वय ४९) असून, ते मूळचे बिहार राज्यातील गोपाळगंज जिल्ह्यातील राजघाट गावचे रहिवासी होते. सध्या ते पत्नी रंजू देवी, मुलगा बंटी व अनुराग, तसेच मुलगी अंजली यांच्यासह नारेगाव येथे वास्तव्यास होते. बॅरिस्टर काही वर्षे आकार टुल्स लि. मध्ये कायमस्वरूपी कामगार म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन अलीकडेच ठेकेदारामार्फत तात्पुरत्या स्वरूपात काम सुरू केले होते. १२ सप्टेंबर रोजी बॅरिस्टर कामावर हजर झाले होते. त्याच दिवशी त्यांनी नाईट शिफ्टही केली.
दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ब्रेक दरम्यान सहकाऱ्याने दिलेले विषारी पदार्थ मिसळलेले अन्न त्यांनी खाल्ले, असा आरोप आहे. त्यानंतर ते घरी गेले असता प्रकृती खालावली. पत्नीने प्रथम त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १७ सप्टेंबर रोजी त्यांना ईएसआयसी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे उपचार न मिळाल्याने अखेर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस उपचार सुरू असताना अखेर शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
पोस्टमार्टमनंतर मृतदेह आणला थेट कंपनीत
शनिवारी पोस्टमार्टम झाल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पत्नी रंजू देवी आणि नातेवाईकांनी मृतदेह थेट कंपनीत आणून ठेवला. यामुळे परिसरात मोठी खळाळ उडाली.