कोथरूड हादरलं! धारदार हत्याराने तरूणावर हल्ला; पण नेमके कारण तरी काय?
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता जुन्या वादातून तिघांनी एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचा प्रकार कोथरूडमध्ये घडला आहे. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातावर हत्याराने वार केल्याने तो यात गंभीर जखमी झाला आहे. शास्त्रीनगर येथील कैलास मित्र मंडळाजवळ राहणाऱ्या दिनेश संदिप भालेराव (वय २७) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्यानूसार, कोथरूड पोलिसांनी उदय थोरात (वय १८), निखिल थोरात (वय २१) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ नोव्हंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी सर्व एकाच परिसरात राहतात. ते एकमेकांना आधीपासून ओळखतात. त्यांच्यात वादही आहेत. घटनेच्या दिवशी तक्रारदार तरूण कैलास मित्र मंडळाजवळील कट्ट्यावर बसला होता. आरोपी उदय थोरातने तक्रारदाराला पाहिल्यावर इतर आरोपींना बोलावून घेतले. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. तेव्हा तक्रारदार तेथून निघून जात असताना, आरोपी थोरात यांनी आणलेल्या हत्याराने तक्रारदाराच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातांवर घाव घातले. त्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप देशमाने आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : स्मशानभूमीतील लाकडावर रक्ताचे डाग; ‘त्या’ खुनाचा लागला छडा
जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला
पुण्यातही गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या काही दिवसाखाली पुण्यात वर्षभर कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेश गजसिंह हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केली होती. एक महिन्यापुर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आहे. दरम्यान महेश व जखमी यांच्यात शाब्दीक वादावादी झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास तक्रारदार व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले असता आरोपी त्याठिकाणी घातक हत्यारे घेऊन आले. अमित परदेशी याच्या डोक्यात तसेच हनुवटीवर वार करून गंभीर जखमी केले. तर, तक्रारदाराला उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश याच्यावर देखील आरोपींनी सपासप वार करून गंभीर जखमी केले. नंतर चौघांनी अजय पवार याच्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.