
Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
बाणेर-बालेवाडी प्रभागात दाखवले जातेय मतदारांना पैशांचे आमिष
प्रभाग क्रमांक ९ मध्ये होणार चुरशीची लढत
बाणेर पोलिसांनी केली मोठी कारवाई
पुणे: बाणेर-बालेवाडी प्रभागातील मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याऱ्या तिघांविरुद्ध बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ६३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. बाणेर-बालेवाडी प्रभागातील (प्रभाग क्रमांक ९) महापालिका निवडणूक चुरशीची होत असून, मतदारांना प्रलोभन दाखविण्यात येत आहे, अशी माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना मिळाली.
‘बाणेर भागातील रोहित लक्ष्मण उत्तेकर याच्या ॲटोकेअर गॅरेजजवळ दोघे जण थांबले असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मत द्यावे, यासाठी मतदारांना पैशांचे आमिष दाखवित आहेत’, अशी माहिती पोलीस निरीक्षक सावंत यांना शुक्रवारी (९ जानेवारी) मिळाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक सावंत यांनी दिली. पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासह पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेथून गणेश सुनील लिंगायत (वय २४, रा. बालेवाडी)याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील दुचाकी ऋषीकेश भगवान बालवडकर (रा. बालेवाडी) याच्या मालकीची असल्याचे उघडकीस आले. दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखांची रोकड जप्त करण्यात आली’, अशी माहिती पोलीस निरीक्षक सावंत यांनी दिली.
‘त्यानंतर पोेलिसांचे पथक ऋषीकेश बालवडकर याच्या घरी पोहोचले. त्याच्या घरातून एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पैसे वाटप करण्यासाठी गॅरेजची जागा उपलब्ध करुन दिल्या प्रकरणी रोहित उत्तेकर, गणेश लिंगायत, तसेच ऋषीकेश बालवडकर यांच्याविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता १७० आणि १७३ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली’, असे पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या अलका सरग, सहायक निरीक्षक स्वाती लामखेडे, कैलास डाबेराव, उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे, पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड, अतुल भिंगारदिवे, प्रीतम निकाळजे, गजानन अवतिरक, विकास भोरे, दत्ता काळे, रमेश क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.
मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मीनाक्षी शिंदे यांचे एक कार्यकर्ते मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांना निवडणुकीसाठी मदत करत असल्याने, मीनाक्षी शिंदे यांनी त्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.