कानाखाली मारल्याच्या राग अनावर; लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
पुणे : कानाखाली मारल्याच्या रागातून १९ वर्षीय तरुणाचा लोखंडी धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव पठार भागात घडली आहे. खून करून पसार झालेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे (२३, रा. तीन हत्ती चौक, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन उर्फ निखील अशोक सावळे (१९) आहे.
कानशिलात मारल्याचा राग ठेऊन घेतला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धैर्यशील आणि आर्यन यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. ११ जुलै रोजी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी आर्यनने धैर्यशीलच्या कानाखाली मारले होते. त्याच रागातून आरोपीने आर्यनवर लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत आर्यनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
आरोपीचा पाठलाग करून अटक
खून झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी धैर्यशील मोरे याचा शोध घेतला. त्यानुसार, आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, ‘कानशिलात मारल्याचा राग मनात धरला होता,’ असे त्याने सांगितले.
हे सुद्धा वाचा : लिफ्ट मागणे बेतले जिवावर, भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीचं मृत्यू
पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वैयक्तिक वादातून हिंसाचार किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीही काम धंदा न करता सातत्याने दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे लहान भावाचा मोठ्या भावाने चाकूने सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. मोठ्या भावानेच लहान भावाचा खून केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, गणेशनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ अनिकेत (वय २६) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.