एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
छत्रपती संभाजीनगर : 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. छावणी पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याने हा गुन्हा एनडीपीएस पथकाकडे सोपवण्यात आला होता. पथकाने परराज्यातून तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
मोहम्मद एजाज अब्दुल हाफीज शेख (वय ३८ रा. सुरत, गुजरात), हरीओम उर्फ हर्श मनोज राठोड (वय २५ रा. सेंधवा, मध्यप्रदेश), हाजी उर्फ इस्माईल अन्सारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. मोहम्मद एजाज याला २६ एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर ५ मे रोजी हरिओम उर्फ हर्ष राठोड आणि ७ मे रोजी हाजी उर्फ इस्माईल अन्सारी याला अटक करण्यात आली असून, त्या दोघांना ९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, आरोपींच्या ताब्यातून एक चारचाकी, 7 मोबाइल असा सुमारे २० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी गुन्ह्याचा तपास एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गिता बागवडे यांच्याकडे 24 मार्चला सोपवला होता. बागवडे आणि पथकाने तपास करत पाच आरोपी निष्पन्न केले होते.
शिवनाथ योगी पसार
यामध्ये बब्बु उर्फ जमील शहा याचा मृत्यू झाला होता. तसेच इतर आरोपींमध्ये मोहम्मद, हरीओम उर्फ हर्श, हाजी उर्फ इस्माईल अन्सारी आणि शिवनाथ योगी यांचा समावेश आहे. शिवनाथ योगी हा पसार असून, त्याचा शोध सुरु आहे. गुन्ह्यात अटक करण्यात आलेले तिघे आरोपी सराईत असून, ते मध्यप्रदेशात अवैधरित्या बायोडिझेल आणि युरियाचा व्यवसाय करत असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.