दुचाकी खांबाला धडकल्याने दोन ठार
मसूर : मसूर-उंब्रज रोडवर वडोली भिकेश्वर गावच्या हद्दीत कवठे फाट्याच्या वळणावर अपघात झाला. दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटून मोटरसायकल खांबाला जाऊन धडकली. यामध्ये वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
सलिम महिबुब उस्ताद (वय २०, रा तालीकोटी. ता तालीकोटी. जि विजापुर) व लक्ष्मण भिमराया दोडमनी (वय २१. रा ४१३ कुकनुर गुलबर्गा जेवारगी, कर्नाटक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वीटभट्टीवर कामाला असलेले सलिम महिबुब उस्ताद व लक्ष्मण भिमराया दोडमनी हे दोघेजण पल्सर (नं एम.एच.-५०-डी ४७७८) वरुन उंब्रज ते मसूर रोडने जात असताना कवठे फाट्याच्या उजवीकडे वळणावर दुचाकी चालवत असलेला लक्ष्मण भिमराया दोडमनी याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडच्या खाली जावून खांबाला दुचाकी धडकली.
दरम्यान, दोघेजण दुचाकीसहल बऱ्याच अंतरावर लांब जाऊन पडले. त्यात दोघेजण गंभीर झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुनिल शहाजी जाधव (मूळ रा. उपाळे मायणी. ता कडेगाव. जि सांगली. सध्या रा कोर्टी. ता कराड. जि सातारा) यांनी मसूर पोलिसात माहिती दिली. अधिक तपास मसूर पोलीस करीत आहेत.
बुलडाण्यात भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, बुलडाण्यातील पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या दुचाकीला रेती भरलेल्या टिप्परने जबर धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.9) सकाळी साडेअकराच्या सुमारास भेंडवळजवळील माऊली फाटा येथे झाला. यात दुचाकीवरील आजी-आजोबाही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.