पटवाऱ्याची गळफास लावून आत्महत्या
नागपूर : भांडेवाडीतील कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावर लेआऊट टाकून प्लॉटची विक्री प्रकरणात सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयानेही जामीन देण्यास नकार दिला होता. उच्च न्यायालयाची भूमिका पाहता याचिकाही परत घेण्यात आली होती. मात्र, या गोष्टीला तीन दिवसही लोटले नव्हते की, या घोटाळ्यातील आरोपी पटवारी अजयकुमार शंकरराव चव्हाण यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली.
विशेष म्हणजे 30 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयातही सुनावणीनंतर 12 सप्टेंबर 2025 रोजी अजयने स्वतःच याचिका परत घेतली होती. जमिनीवर लेआऊट टाकून प्लॉट विकण्यापूर्वी जमिनीचा बोगस सातबारा तयार करण्यात चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप होता. या शासकीय कागदपत्रात आधी जमीन दाखवण्यात आली होती. मात्र, यात फेरफार करून ती जमीन खासगी मालकाची दाखविण्यात आली.
याच आधारावर प्लॉटची खरेदी-विक्री झाली होती. पोलिसांनी पटवारी चव्हाणविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यात आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ही कलम गंभीर असल्याचे सांगून जिल्हा न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला होता.
60 एकर जमीन अधिग्रहीत
1962 मध्ये आरोपींकडून ही जमीन अधिग्रहित केली होती आणि ती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा संकलन केंद्रासाठी राखीव ठेवली होती. आरोपींनी 60.04 एकर जमिनीच्या अधिग्रहणासाठी भरपाईही घेतली होती. जमीन एनआयटीने अधिग्रहित केली आहे हे माहीत असूनही, आरोपींनी तक्रारदाराची फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्लॉट क्रमांक १३-अ, १४-अ विकण्याचा करार केला, असे तक्रारकर्त्याला नंतर माहिती झाले.
स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो नाही
अजय चौहान यांनी त्यांच्या याचिकेतून त्यांनी चुकून गट क्रमांक ११६/३ ऐवजी गट क्रमांक ११६/२ लिहिला होता. त्यांच्या मते, गट क्रमांक ११६/२ हा एनआयटीचा होता, परंतु आरोपींची नावे चुकून नोंदवण्यात आली, असे सांगितले. स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो नाही, असे म्हणत नंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. या आत्महत्येने एकच खळबळ उडाली.