काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियात जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणात ३५ वर्षीय पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर असून तिच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भंडारा गँगरेप प्रकरणी महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या इसमाचे स्केच पोलिसांकडून तयार करण्यात आले आहे. हा आरोपी कुठेही दिसल्यास जवळच्या पोलीस स्थानकाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली होती. या बलात्कार प्रकरणात एकूण ३ आरोपींनी महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी लुखा उर्फ अमित सार्वे आणि मोहम्मद एजाज अंसारी याला अटक केली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस सध्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत असून हे प्रकरण आता एसआयटी (SIT) कडे वर्ग करण्यात आले आहे. बुधवारी १० ऑगस्ट रोजी एसआयटी ( SIT) कडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यानंतर फरार आरोपीचे स्केच तयार करण्यात आले आहे.
असे आहे आरोपीचे वर्णन :
भंडारा गँगरेप प्रकरणी आरोपीचे वय ३० ते ४० वर्ष असून त्याचा रंग सावळा, मध्यम बांधा, काळळे केस, हलकी दाढी, डाव्या हातात जर्मनचा कडा, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपँट, काळ्या रंगाची सँडल टाइप चप्पल असं वर्णन करण्यात आले आहे.
काय घडलं त्या दोन दिवसांत?
पीडित महिला पतीपासून विभक्त झाली होती. नुकतीच ती गोंदियामध्ये राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली होती. दरम्यान, ३० जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्यानं तिनं रात्रीच्या सुमारास घर सोडलं. ती गोंदियातील जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या ठिकाणी आईकडे जाण्याच्या बहाण्याने ती निघाली. रस्त्यात भेटलेल्या अज्ञात आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. पण या नराधमानं तिला घरी न सोडता गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन ३० जुलैला तिच्यावर पाशवी अत्याचार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं दुसऱ्या दिवशीही म्हणजेच, ३१ जुलैला पळसगाव जंगलात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला.
पीडिता कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या (आरोपी २) आरोपीसोबत तिची भेट झाली. त्यानेही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर पाशवी अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत १ ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळ मोह गावाच्या पुलाजवळ सकाळी ८ वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. रात्रभर पीडिता असह्य वेदनांनी विव्हळत रस्त्याशेजारी पडून होती.
पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला पाहताच काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा संशय आल्यानं गावकऱ्यांनी तात्काळ कारधा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे सुरुवातीचा गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडल्यानं भंडारा पोलिसांनी संबंधित गुन्हा गोंदियाच्या गोरेगाव पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.