एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी, थायलंडमध्ये केले इमर्जन्सी लँडिंग (फोटो सौजन्य-X)
Thailand Air India Emergency Landing in Marathi : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी (13 जून) एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग थायलंडमधील फुकेत येथे करण्यात आले. विमान क्रमांक AI-379 थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला येत होते. परंतु शुक्रवारी बॉम्बच्या धमकीनंतर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे एक विमान कोसळले. विमानातील २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला.
एअर इंडियाचे विमान एआय ३७९ फुकेतहून नवी दिल्लीला निघाले. या विमानात १५६ प्रवासी होते, परंतु उड्डाणानंतर बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर अंदमान समुद्राभोवती फिरून विमान परतले आणि इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फुकेट विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे आणि सर्वजण सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या AI-379 या विमानाने सकाळी ९:३० वाजता फुकेतहून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. उड्डाणानंतर अवघ्या २० मिनिटांत विमानाच्या शौचालयात बॉम्बची धमकी असलेली चिठ्ठी सापडल्याची माहिती आहे. यामुळे वैमानिकाने तातडीने अंदमान समुद्रात चक्कर मारून विमान परत फुकेतला उतरवले.
तसेच याआधी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान तीन तास हवेत राहिल्यानंतर मुंबईत परत उतरविण्यात आले. वृत्तसंस्था पीटीआयने फ्लाइटराडार २४ मधील डेटाचा हवाला देत म्हटले आहे की, हे विमान मुंबईहून लंडनला जात होते, जे सकाळी ५.३९ वाजता उड्डाण केले.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, इराणमधील परिस्थिती आणि त्यांचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, अनेक उड्डाणे एकतर वळवली जात आहेत किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी परत उतरण्यास भाग पाडले जात आहेत.
इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला आहे. त्यामुळे अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे.
गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, ज्यामध्ये २४२ प्रवासी होते. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बीजे हॉस्पिटलच्या वसतिगृहाशी धडकले. विमानात असलेल्या २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. वसतिगृहात उपस्थित असलेल्या अनेक लोकांचाही मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २६५ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि इतर २४१ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी रुग्णालयात जखमींचीही भेट घेतली. विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार रमेश यांच्याकडून पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्षदर्शींचे वृत्तांत घेतले.