
भरधाव डंपरची दुचाकीला धडक, तरुणाच्या उजव्या हाताचा चेंदामेंदा; चालक फरार
पिंपरी : राज्यासह देशभरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दररोज अनेक लोकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. भरधाव वेगात आलेल्या एका डंपरने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बदगाव ते आळंबी रोड, अकरवाडी, चऱ्होली खुर्द येथे ही घटना घडली आहे.
डंपरचालकाच्या हयगयीमुळे हा अपघात झाला असून, तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी बाळवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी राजकुमार भानुदास बिराजदार (वय ३२, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात डंपर क्रमांक एम.एच.१४ एन.एक्स. ९८९१ वरील चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा बाळवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ०४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे फिर्यादीच्या उजव्या हाताचा चेंदामेंदा झाला. तसेच, तोंडाला आणि छातीस गंभीर मार लागून ते जखमी झाले आहेत. डंपरवरील चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून हा अपघात घडवला आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला आहे.
लोणावळ्यामध्ये भीषण अपघात
मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये असलेल्या लायन्स पॉईंट जवळ कार आणि टेम्पो यांच्यात शनिवारी (दि. ६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. योगेश सुतार आणि मयूर वेंगुर्लेकर (दोघेही रा. म्हापसा, गोवा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, लोणावळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने सहराकडे जाणाऱ्या टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.