
छापेमारीत उद्योजकाने स्वतःवर झाडली गोळी
बंगळुरू : बंगळुरूच्या रिचमंड सर्कल येथील ‘कॉन्फिडेंट ग्रुप’चे आलिशान कार्यालय शुक्रवारी रणांगण बनले होते. आयकर विभागाचे अधिकारी टेबलावर पसरलेल्या फाईल्सची कसून चौकशी करत होते आणि सर्वत्र गंभीर शांतता होती. या धावपळीत ग्रुपचे चेअरमन सी. जे. रॉय आपल्या केबिनमध्ये शिरले. पुढील क्षणी काय घडणार, याची कोणालाही कल्पना नव्हती.
अचानक एका गोळीच्या आवाजाने पूर्ण कार्यालय हादरले. जेव्हा अधिकारी केबिनच्या दिशेने धावले, तेव्हा तिथले दृश्य भयावह होते. रिअल इस्टेट क्षेत्रातील हा दिग्गज उद्योजक रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता. रॉय यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच स्वतःच्या परवानाधारक पिस्तूलने छातीत गोळी झाडून घेतली होती. त्यांना तातडीने नारायण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
आयकर विभाग गेल्या काही काळापासून रॉय यांच्या व्यावसायिक व्यवहारांवर लक्ष ठेवून होता. मागील छापेमारीनंतर शुक्रवारी पुन्हा नवीन छापे टाकण्यास सुरुवात झाली होती, ज्यामुळे रॉय प्रचंड तणावात होते. अधिकारी त्यांच्या खात्यांची तपासणी करत असताना संभाव्य अपमान किंवा आर्थिक संकटाचा दबाव त्यांना सहन झाला नसावा. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच टोकाचे पाऊल उचलणे, हे त्यावरील दबावाची तीव्रता किती प्रचंड होती हे दर्शवते.
उत्पन्नापेक्षा जास्त आढळली मालमत्ता
छापेमारीदरम्यान त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्तेशी संबंधित काही महत्त्वाचे दुवे समोर आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रॉय वारंवार पडणारे आयकर छापे आणि अलीकडील कारवाईमुळे खोलवर मानसिक तणावाखाली होते. याच दबावामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
पंजाबच्या माजी पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
काही दिवसांपूर्वीच, पंजाबचे माजी आयपीएस अधिकारी (IPS Officer) अमर सिंग चहल (Amar Singh Chahal) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. ते पटियाला येथील त्यांच्या घरी गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आणि सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये ऑनलाइन फसवणुकीमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानाची आणि त्रासाची माहिती आहे.
हेदेखील वाचा : Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा