जबरदस्तीने महिलेची सोनसाखळी हिसकावली अन्...; बिबवेवाडी-स्वारगेट रोडवरील धक्कादायक घटना
पुणे : बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून, घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. चोरट्यांनी हिसका दिल्यानंतर महिला खाली कोसळली. त्यातून ती बचावली आहे. ९९ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून चोरटे पळून गेले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार या शिवदर्शन परिसरात राहण्यास आहेत. त्या मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास बिबवेवाडी-स्वारगेट रोडने घरी पायी चालत जात होत्या. त्यावेळी पाठिमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत पाठिमागे बसलेल्या चोरट्याने बळाचा वापर करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. अचानक झालेल्या याप्रकाराने महिला भेदरली. जोराचा हिसका बसल्याने महिला खाली कोसळली. चोरट्यांनी हिसका मारून सोनसाखळी तोडून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला. परंतु, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पर्वती पोलीस करत आहेत.