तुझं प्रमोशन करतो, पगार वाढवतो, त्या बदल्यात मला...; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून अशा घटना उघडकीस येत असतात. वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. खराडी भागातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या आयटी इंजिनिअर महिलेचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सहकारी असलेल्या वरिष्ठावर गुन्हा दाखल केला. याबाबत ३४ वर्षीय महिलेने खराडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील वरिष्ठ सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, खराडी येथील एका आयटी कंपनीत संबंधित महिला काम करते. आरोपी या कंपनीतील ‘टिम लिडर’ आहे. शुक्रवारी (३ ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास आरोपीने महिलेला बोलावून घेतले. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे सांगून त्याने महिलेला तळमजल्यावरील वाहनतळावर नेले. वाहनतळावर त्याने कार लावली होती. महिलेला त्याने कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर ‘महिलेला तुझी पदोन्नती, वेतनवाढ करतो’, त्याबदल्यात मला काहीतरी पाहिजे असं आरोपी म्हणाला. महिलेने त्याला नकार दिला. त्यावेळी आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन केले. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक मुबारक शेख तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार
हरियाणाच्या गुरुग्राम येथे एका शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, शुक्रवारी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्याचे समोर आले आहे. प्रकरणातील आरोपी जिम ट्रेनर असून ते झुंबा डान्सचं देखील ट्रेनिंग देत असल्याची माहिती पीडित महिलेनं दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात पीडित शिक्षिकेची गौरव नावाच्या तरुणासोबत एका पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर, 1 ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा आरोपीने पीडितेला फोन करून तिला आपल्या मित्राच्या घरी बोलवलं. त्या खोलीत आधी कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र, काही वेळानंतर आरोपीने आपल्या इतर मित्रांना सुद्धा तिथे बोलवलं. तक्रार देतांना पीडितेने सांगितलं की, गौरव महिलेला त्याच्या मित्राच्या खोलीत घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. यांनतर, आरोपीने त्याच्या नीरज नावाच्या मित्राला सुद्धा फोन करून बोलावून घेतलं आणि नीरजने सुद्धा पीडित महिलेवर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, गौरव आणि निरांजने त्यांच्या अभिषेक आणि योगेश नावाच्या मित्रांना सुद्धा खोलीत बोलावलं आणि त्या दोघांनी सुद्धा मिळून पीडितेवर बलात्कार केला आहे.