वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी केले धक्कादायक खुलासे, प्रकरणाला वेगळे वळण? (फोटो सौजन्य-X)
Vaishnavi Hagawane News Update in Marathi: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेंच्या वकिलांनी अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, वकिलाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन वकिलाने केलेल्या सर्व दाव्यांचे खंडन केले. त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याचे काम केले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मी माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला नाही. उलट आरोपीलाच दीड लाखांचा मोबाईल घेऊन दिला, असा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.
वैष्णवी अन्य मुलाशी चॅटिंग करत होती. आम्ही याबाबत वैष्णवीच्या आई-वडिलांना कल्पना दिली होती. त्या मुलाने बोलण्यास नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली असावी, असा दावा हगवणे कुटंबाच्या वकिलाने केला होता, यावर बोलताना वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, मला चॅटिंगसंदर्भात हगवणे कुटंबाने पुसटशीही कल्पना दिलेली नाही. त्या विषयावर कोणतंही भाष्य झालेलं नाही. चॅटिंगचं उदाहरण देऊन त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर सरळ-सरळ संशय घेतला आहे, असं अनिल कस्पटे यांनी म्हटलंय.
तसेच, मी माझ्या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला, हा त्यांचा आरोप आहे. मी माझ्या मुलीला मोबाईल अगोदरच दिलेला होता. सोबतच मी आरोपीलाही एक लाख 52 हजारांचा मोबाईल घेऊन दिलेला आहे. माझ्या मुलीला त्यांनी तेथे बोलवून घेतलं. मला तुझ्या पप्पांकडून मोबाईल घेऊन दे, असं आरोपीने माझ्या मुलीला सांगितलं होतं. त्यानंतर माझ्या मुलीनं मला कॉल केला होता. त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांच्या मागमीनुसार मी त्यांना मोबाईल दिलेला आहे, असा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय.
दरम्यान, वैष्णवीच्या चारित्र्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर हगवणे कुटुंबाच्या वकिलाने आम्ही वैष्णवीचे चारित्र्यहनन केलेले. ती कोणत्या मुलाशी बोलायची, त्या मुलाचं नाव मी घेऊ इच्छित नाही, असं त्या वकिलाने सांगितलं.