
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या अडचणी वाढल्या; घरात पोलिसांना काय-काय सापडलं?
घायवळ टोळीतील गुंडांकडून झालेला नागरिकांवरील गोळीबार, घायवळचे परदेशात जाणे, पासपोर्टबद्दलचा संशय या सर्व प्रकरणाचा तपास करत असतानाच त्याच्या आर्थिक स्त्रोतांची आणि मालमत्तांची माहिती घेतली जात आहे. कोथरूडमधील श्री संत ज्ञानेश्वर कॉलनीतील त्याच्या घराची झडती कोथरूड पोलिसांनी शनिवारी (४ ऑक्टोबर) घेतली. तेव्हा त्याच्या घरात पोलिसांना जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी दोन काडतुसे, तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या.
लुक आऊट नोटीस…
निलेश घायवळ ११ सप्टेंबर रोजी ३ महिन्यांच्या व्हिजावर स्वित्झर्लंडला गेल्याची माहिती समोर आली आहे. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजाविली आहे. स्वतःच्या आडनावात फेरफार करून पारपत्र मिळविल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. त्याला पारपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
पोलिसांनी निलेश घायवळ याच्या शास्त्रीनगर कोथरुड येथील घर तसेच कार्यालयाची झडती घेतली. यावेळी पिस्तूलाची दोन जीवंत काडतूसे, चार रिकाम्या पुंगळ्या, साठ हजारांची रोकड, दहा तोळे सोने, पुणे, मुळशी, जामखेड आणि धाराशिव जिल्ह्यातील जमीनीचे खरेदीखत, साठेखतासह इतर काही कागदपत्रे मिळून आली आहेत. पुढील तपास सुरू आहे. – संभाजी कदम, पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन