
एका दिवसात दोन ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले (Photo Credit- X)
गळा दाबून वर्दी फाडणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या आई व वडिलांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेंद्र रणयेवले असे रिक्षा चालकाचे नाव आहे. तर राजेंद्र रणयेवले व माया राजेंद्र रणयेवले (सर्व रा. नवजीवन कॉलनी, एन-११, हडको) अशी आरोपीच्च्या आई वडिलांची नावे आहेत. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
अंमलदार विनोद गजानन खरात (३८) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, सिडको परिसरातील सुदर्शननगर येथे सायंकाळी कारला रिक्षाची धडक बसल्याची माहिती डायल ११२ वर मिळाली. त्यानुसार फिर्यादी खरात व त्यांचे सहकारी अंमलदार कावळे असे दोघे घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबंधित रिक्षाचालक शुभम रणयेवले हा मद्यधुंद अवस्थेत आढळला. त्याने कारला धडक दिल्यानंतर कारमालक व त्यांच्या नातेवाईकांशी वाद घालत अश्लील शिवीगाळ करित होता. तेंव्हा कारमलकाला पोलिस ठाण्यात येवून तक्रार देण्यास सांगितले.
पोलिसांनी रिक्षासह चालक शुभम रणयेवले याला ताब्यात घेत ठाण्यात निघाले. तेंव्हा शुभम पुन्हा कारमलासह त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करु लागला. फिर्यादीने त्याला शांत राहण्यास सांगत असतांनाच शुभमच्या आईने त्यांचा हात ओढून धरला, व माझ्या मुलाला बोलु नको, मी त्याला पोलिस ठाण्यात घेवून जावू देणार नाही असे म्हणत त्यांच्या हाताला झटका देवून सोडवले. तर शुभमने रिक्षातच फिर्यादीला मारहाण करण्यास सुरवात केली. व वर्दीचे लाईनयार्ड, नेमप्लेट आणि शर्टाची बटणे तोडली. तर शुभमच्या वडिलांनी फिर्यादीचा गळा दाबला. हा प्रकार सुरु असतांना कारचालकाने शुभमच्या वडिलांना ओढून फिर्यादीपासुन दुर केले. त्यानंतर अतिरिक्त कुमक बोलावून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याच दिवशी दुपारी हायकोर्ट सिग्नल येथे वाहतूक शाखेच्या कर्मचा-याने मद्यपी दुचाकीस्वारावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्याने मारहाण केली. त्या वेळी त्याच्या पत्नीनेहीं पोलिसांशी धक्काबुक्की केल्याची नोंद आहे. दोन स्वतंत्र ठिकाणी, काही तासांच्या अंतराने घडलेल्या या घटनांनी पोलिस दलाची प्रतिमा आणि अधिकार यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविणे, अपघात घडविणे आणि कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हात उगारणे हा धोकादायक प्रवाह बनत चालला आहे. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर वारंवार हल्ले होत राहिल्यास त्याचा परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस दलाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असला, तरी अशा घटनाची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तातडीची अंमलबजावणी आवश्यक आहे.
Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?