पुणे- मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची टेम्पोला धडक; दोघांचा जागीच मत्यू
वडगाव मावळ : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या टेम्पोवर जाऊन कार धडकली आहे. या भीषण अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि.५) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर ब्राम्हणवाडी, साते येथे घडली.
ताविश जावेद अहमद (वय २४), राशीद सोहराब खान (वय २४ आदर्शनगर मोशी ता. हवेली) यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दिलशाद नियाज खान (वय २५ रा. आदर्शनगर, मोशी), महम्मद शाहीद रिझवी (वय २४), झिशान कलाम शाहीद (वय २४), फैझान मुस्ताक खान(वय २४ रा. आदर्शनगर, मोशी) हे जखमी झाले आहेत. याबाबत खंडाप्पा बसराज हारकुडे (वय ३५ रा. ब्राम्हणवाडी, साते) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फैझान मुस्ताक खान हा चार चाकी (कार नं. एम एच १२/एक्सइ ५०८३) चालवत होता. परंतु भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभा असणारे आयशर टेम्पोच्या (एमएच ०४/एचवाय ३१७९) पाठीमागील बाजुस कार आदळली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जावळे करीत आहेत.
दीर- भावजयचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हे सुद्धा वाचा : भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; महिला पोलीसाचा जागीच मृत्यू