दोन बहिणींवर ऑटोमध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही. असे असताना आता वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका रिक्षाचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघींनी प्रसंगावधान साधून धावत्या ऑटोतून उड्या मारल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पुणे येथील स्वारगेट अत्याचार प्रकारानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे एका रिक्षाचालकाने मित्राच्या सहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोन्ही मुलींना घटनेचे गांभीर्य ओळखून धावत्या रिक्षातूनच उड्या मारल्या. त्यामुळे रिक्षाचालकाचा अत्याचाराचा हा प्रकार फसला. ही घटना शनिवारी (दि.1) दुपारी अडीचच्या सुमारास दारव्हा-यवतमाळ रस्त्यावरील रामनगर ते कारंजा रस्त्यावरच्या रेल्वे रुळाजवळ घडली.
हेदेखील वाचा : PCMC Crime: दरोडेखोरांचा उपायुक्तांवर कोयत्याने भीषण हल्ला; धुमश्चक्रीत पोलिसांनी…, वाचा थरारक घटना
कारंजा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी 20 वर्षांची असून, ती कवठा बाजार (ता. आर्णी जि. यवतमाळ) येथील रहिवासी आहे. शनिवारी (दि. 1) सकाळी 11 ते 2 यावेळेत तिच्या लहान बहिणीचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्यामुळे ती बहिणीसह रामनगर (प्रिंप्री फॉरेस्ट) येथे आली होती. पेपर संपल्यानंतर दुपारी 2.15 वाजता परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या ऑटो (एमएच 16/ बी-9589) चालकाला तिने रामनगर फाटा येथे जायचे आहे, असे म्हटले असता चालकाने त्याला होकार दिला.
दरम्यान, दोघीही ऑटोमध्ये बसल्या. परंतु, या ऑटोत अगोदरच चालकासोबत एक व्यक्ती बसलेला होता. ऑटो रामनगर फाट्याकडे निघाली असताना अंदाजे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील कारंजा ते यवतमाळ जाणाऱ्या रेल्वेरुळाच्या थोड्या अगोदर चालकाने ऑटो थांबवली व ऑटोमध्ये जोरजोराने गाणी वाजवू लागला. त्यामुळे मुली घाबरल्या होत्या. त्यानंतर थोड्या अंतरावर जात रिक्षा पुन्हा सुरु झाल्यानंतर या दोन्ही मुलींनी रिक्षातून उड्या घेतल्या. त्यामुळे पुढील प्रकार टळला.
लग्नाच्या आमिषाने सातत्याने अत्याचार
दुसऱ्या घटनेत, मोर्शी येथे लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत 6 महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.