पोलिस उपायुक्तांवर कोयत्याने हल्ला
पिंपरी: फरार दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलिस उपायुक्त आणि एक सहाय्यक पोलिस निरिक्षक जखमी झाले. मात्र, पोलिस उपायुक्तांनी स्वरक्षणार्थ आणि टीमच्या रक्षणासाठी आपल्या सर्विस रिवोल्वरद्वारे दोन गोळ्या झाडून दरोडेखोराला जायबंदी केले. त्यानंतर दरोडेखोराला अटक केली. दरम्यान, दुसरा अल्पवयिन दरोडेखोर घाबरून पळून गेला असता पोलिसांनी त्यालाही पकडून अटक केले. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन मार्च रोजी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. सचिन चंदर भोसले आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसन्न जऱ्हाड हे या घटनेत जखमी झाले आहेत.
बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस करत होते. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, बहुल येथिल घटनेतील दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांना माहिती मिळताच सुट्टी असताना देखील त्यांनी चाकण पोलीस ठाणे गाठले. चाकणच्या तपास पथकास बोलावून घेतले. पोलिसानी नियोजन करुन सापळा रचला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले असता दरोडेखोरांनी थेट पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढवला. दरोडेखोरांनी केलेला वार उपायुक्त पवार यांनी हुकवला. मात्र एक वार छातीवर बसला यात उपायुक्त पवार जखमी झाले. तसेच तपास पथकाचे प्रमुख जऱ्हाड यांच्यावरही वार करण्यात आला. तो त्यांच्या दंडावर बसल्याने ते जखमी झाले.
अचानक झालेल्या हल्ल्यात उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले आहेत. दरम्यान, स्वतःला सावरत, गांभिर्या लक्षात घेत, स्वताचा बचाव करण्यासाठी उपायुक्त पवार यांनी प्रत्युत्तरादाखल स्वत जवळील पिस्तूल मधून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी एका आरोपीच्या पायाला लागल्याने तो खाली पडला. त्यावेळी त्याला घटनास्थळीच अटक करण्यात आले आहे. इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले.
अशी घडली घटना….
– बहुळ येथे २३ फेब्रुवारी रोजी सहा दरोडेखोरांनी घरात वृद्ध दांम्पत्याला लुटले
– या दरोड्याच्या घटनेचा तपास पोलिस करत होते.
– दोन मार्च रोजी साडेनऊ वाजता पोलिसांनी दरोडेखोरांची माहिती मिळाली
– पोलिस उपायुक्त शिवाजी पवार सुट्टी असतानाही त्यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला
– पोलिस उपायुक्त, एक सहाय्यक पोलिस निरिक्षक आणि नऊ कर्मचाऱ्यांची टीम घेऊन ते चिचोशी गावातील केंदूरघाट येथे पोहचले
– केंदूरघाटातील मंदीरात दरोडेखोर दबा धरून बसल्याचे दिसून आले
– पोलिसांनी दरोडेखोरांना शरण येण्याचे अवाहन केले
– मात्र, दरोडेखोरांनी शरण न येता पोलिसांवर थेट हल्ला केला
– या हल्ल्यात पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक जखमी झाले
– हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिस उपायुक्तांनी दरोडेखोरावर दोन गोळ्या झाडल्या
– एक गोळी दरोडेखोराच्या पायाला लागून तो जखमी झाला
– एक अल्पवयीन दरोडेखोर पळून जाऊन लागला. मात्र, पोलिसांनी पाटलाग करून त्याला अटक केली
दरोडेखोरांनी हल्ला केल्याने गोळीबार….
पोलिस उपायुक्त शिवाजी पवार हे शांत आणि संयमी स्वभावाचे अधिकारी आहे. आपल्या हद्दीतील कायदा सुव्यवस्था चांगली रहावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशिल राहतात. गुन्हेगारी वाटेवर जाणाऱ्या अनेक तरुणांचे त्यांनी समुपदेशन केले आहे. मात्र, दरोडेखोरांनी अचानक कोयत्याने त्यांच्या छातीवर आणि सहकाऱ्याच्या दंडावर जोरदार वार केल्याने ते जखमी झाले. स्वसंरक्षण आणि दरोडेखोरांना पकडण्यासाठी त्यांना पिसत्ूलातून दोन गोळ्या झाडाव्या लागल्या.
उपचार घेऊन पुन्हा कर्तव्यावर…
दरोडेखोर सचिन याच्या पायाला गोळी लागल्याने तो गंभिर जखमी झाला. पोलिसांनी त्याला सुरुवातीला चाकण येथिल एका रुग्णालयात नेले. त्यानंतर पिंपरी – चिंचवड येथिल रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दरम्यान, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या छातीवर पाच टाके पडले. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्या दंडालाही मोठी जखमी झाली आहे. दोघेही रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा कर्तव्याववर हजर झाले आहेत.
मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार, यापूर्वी नऊ गुन्हे दाखल…
बहुळ येथील दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन चंदर भोसले आणि अल्पवयिन आरोपी हे पोलिसांच्या रडारवर होते. ते पुन्हा दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली होती. सचिन भोसले हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बहुळ येथील दरोडय़ाच्या गुन्ह्यात पाहिजे असणारे दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहायक निरीक्षक जऱ्हाड हे पथका सह गेले. त्यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला यात पवार आणि जऱ्हाड जखमी झाले. यावेळी स्वरक्षणार्थ उपायुक्त पवार यांनी दोन गोळ्या झाडल्या, यात दरोडेखोर जखमी झाला. पुढील तपास सुरु आहे.
विनय कुमार चौबे
पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड