
फोटो सौजन्य - Social Media
बार्शी प्रतिनीधी : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत 10 जणांना रंगेहात अटक केली. लातूर बायपास रोडवरील नागोबाचीवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात रोख रक्कम, मोबाईल फोन आणि वाहनांसह एकूण 12 लाख 31 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मटका, जुगार, गुटखा विक्री आणि अवैध मद्य व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्याच अनुषंगाने बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी रात्री गस्त घालत होते.
यावेळी नागोबाचीवाडी येथील ‘लक्झरी डिलक्स स्पा मसाज सेंटर’मध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकत कारवाई केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्पा सेंटरवर अचानक धाड टाकली. छाप्यादरम्यान काही जण पैशांची पैज लावून ‘तिरट’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सर्वांना ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात हा जुगार अड्डा स्पा सेंटरचा मालक आकाश काशिद आणि मॅनेजर बाबू चौधरी यांच्या माध्यमातून चालवला जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांसह जुगार खेळणाऱ्या इतर आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मोबाईल फोन तसेच काही वाहने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 12 लाख 31 हजार 100 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक निर्माण केला आहे.
सोलापूर जिल्हा पोलिसांकडून सध्या अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. जुगार, मटका, गुटखा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जात असून कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस अंमलदार सोमनाथ खांडेकर, सुरेश बिरकले, महंमदगौस महेदी तसेच चालक लक्ष्मण चिट्टलवाड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
या धाडसी कारवाईमुळे बार्शी तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.