
भाईंदर : भाईंदर पूर्व येथील सोनल पार्क संकुलात एका सोनाराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुशांत पाल (51) असे मृत सोनाराचे नाव असून, या प्रकरणात कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाने मिळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला विधीसंघर्षित बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
सोनल पार्क येथील इमारत क्रमांक 01 मधील शॉप नंबर 01 येथे सुशांत पाल यांचा सोनारकामाचा कारखाना असून, तेच त्यांचे निवासस्थानही होते. बुधवारी सकाळी सहकाऱ्यांनी दुकानाचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने खिडकी तोडून आत प्रवेश केला असता ते मृतावस्थेत दिसून आले. डोक्यावर व शरीरावर धारदार व टणक हत्याराने केलेल्या गंभीर जखमा स्पष्ट दिसत होत्या.
नोंदवला गुन्हा
खबर देणाऱ्याच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र.545/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम103(1) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे व सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
कौटुंबिक वादातून हत्या
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृत पॉल हे काही दिवसांपासून कौटुंबिक वादामुळे कारखान्यातच राहत होते. पत्नी अमृता पाल आणि मुलगे सुमित व अनित हे पैशांवरून त्यांच्याशी वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 18 नोव्हेंबरच्या रात्री दुकानात पॉल आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे समोर आले. संशयितांचा शोध घेऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पत्नी अमृता पाल आणि मुलगा सुमित यांनी हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलगा अनित यालाही या घडामोडीत सहभाग असल्याने विधीसंघर्षित बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक आणि पुढील तपास
अमृता पाल आणि मुलगा सुमित यांना अटक करण्यात आली असून, अनितला बाल न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करीत आहेत.
कारवाईत सहभागी अधिकारी
या तपासात पो.नि. दत्तात्रय ढुमे, सपोनि. अमोल तळेकर, पोउनि. संपत आहेर, पोउनि. संदीप व्हसकोटी यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
कौटुंबिक वैमनस्यातून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.