
पुणे: शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद सुरूच असून, चतु:श्रृंगी तसेच डेक्कनमध्ये फ्लॅट फोडून रोकड पळविली आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून ३ लाख १७ हजार रुपयांची रोकड चोरली. तर, चतु:श्रृंगीत फ्लॅट फोडत ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांत पंडितराव आगाशे शाळेतील ३८ वर्षीय शिक्षिकेने तक्रार दिली आहे.
त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लॉ कॉलेज रस्त्यावर पंडितरावर आगाशे इंग्रजी माध्यम शाळा आहे. शाळेला रविवारी सुट्टी होती. मध्यरात्री चोरटे शाळेत शिरले. कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली तीन लाख १७ हजार रुपयांची रोकड चोरली. सोमवारी सकाळी शाळा उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
औंध भागात ४ लाखांची घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.
आधी मोक्का मग घरफोडी; जेलमधील ओळखीतून पुन्हा गुन्हेगारी
पुण्यामध्ये झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला आहे. कुख्यात गँगस्टर टोळीच्या सदस्याची व कुविख्यात गुन्हेगाराची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई होऊन कारागृहात रवाणगी झाली होती. यानंतर कारागृहामध्ये दोघांची ओळख झाली. तब्बल ५ ते ६ वर्षांनी जामीनावर दोघेही कारागृहाबाहेर आले अन् ओळखीनंतर एकाने झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून शहरभर रेखीकरून घरफोड्या करत कोट्यवधींची माया जमविल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
हेही वाचा: आधी मोक्का मग घरफोडी; जेलमधील ओळखीतून पुन्हा गुन्हेगारी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
एकाने घरफोड्या केल्या आणि दुसऱ्या यातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने एका त्रयस्त गुन्हेगाराच्या मदतीने सरफाना विक्री केल्याचेही या तपासातून समोर आले आहे. स्वारगेट पोलिसांनी ३ कुख्यात गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून १४ घरफोड्यांमधील तब्बल १ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच दोन पिस्तूल देखील जप्त केले आहेत.
गणेश मारूती काठेवाडे (रा. मुखेड. जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३६, रा. अंबरवेड, गवळीवाडा, ता. मुळशी) आणि भिमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (रा. राजस्थान, सध्या सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक निरीक्षक राहुल कोलंबिकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, राहुल तांबे व त्यांच्या पथकाने केली आहे.