मोक्का अंतर्गत जेलमध्ये असणाऱ्या दोन गुन्हेगारांची झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करत होते (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : पुण्यामध्ये झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला आहे. कुख्यात गँगस्टर टोळीच्या सदस्याची व कुविख्यात गुन्हेगाराची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई होऊन कारागृहात रवाणगी झाली होती. यानंतर कारागृहामध्ये दोघांची ओळख झाली. तब्बल ५ ते ६ वर्षांनी जामीनावर दोघेही कारागृहाबाहेर आले अन् ओळखीनंतर एकाने झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून शहरभर रेखीकरून घरफोड्या करत कोट्यवधींची माया जमविल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एकाने घरफोड्या केल्या आणि दुसऱ्या यातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने एका त्रयस्त गुन्हेगाराच्या मदतीने सरफाना विक्री केल्याचेही या तपासातून समोर आले आहे. स्वारगेट पोलिसांनी ३ कुख्यात गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून १४ घरफोड्यांमधील तब्बल १ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच दोन पिस्तूल देखील जप्त केले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
गणेश मारूती काठेवाडे (रा. मुखेड. जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३६, रा. अंबरवेड, गवळीवाडा, ता. मुळशी) आणि भिमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (रा. राजस्थान, सध्या सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक निरीक्षक राहुल कोलंबिकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, राहुल तांबे व त्यांच्या पथकाने केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
स्वारगेट पोलिसांनी एकूण १४ घरफोडीचे तसेच स्वारगेट एसटी स्टॅण्डमधील ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणत ८६ तोळे सोने, १५० हिरे, साडे तिन किलो चांदी, २ पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, १ दुचाकी, झोमॅटोचा ड्रेस व पिशवी यासह ८० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, सॅलेसबरी पार्कमध्ये घरफोडी झाली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाला गणेश काठेवाडेबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने गणेशला उंड्री येथून पकडले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबूली दिली. गणेशचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर तो कुविख्यात गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने स्वारगेटमधील ६, कात्रज येथील दोन तसेच बिबवेवाडी, सिंहगड रोड, मुंढवा, कोंढवा, वानवडी व खडकमधील प्रत्येकी एक घर फोडल्याचे समोर आले.
गणेशने घरफोडीमधून चोरलेले दागिने सुरेश याच्याकडे दिले होते. सुरेशने हे दागिने भिमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीने चार सराफाना विकले होते. पोलिसांनी या सराफांकडे देखील चौकशी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार पथकाने वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्ह्यांतील ऐवज दप्त केला.
१७०० सीसीटीव्ही तपासले
गणेश काठेवाडे सराईत चोरटा आहे. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यात तो पटाईत आहे. घटनास्थळी जाताना व चोरीकरून परत येताना तो गल्ली बोळाचा मार्ग निवडत होता. तो वेगवेगळे कपडे घालत असत. एखाद्या गल्लीत तो वरचा शर्ट काढून टाकून देत असत. तसेच, सीसीटीव्ही आहे, अशा ठिकाणी मुद्दाम मोबाईलवर बोलत असल्याचे भासवत असत. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल १७०० सीसीटीव्ही तपासले.