मुंबई विमानतळावर 11 कोटींचा गांजा जप्त; सोनेही नेले जात होते लपूनछपून, कस्टमला समजताच...
कस्टम विभागाकडून कारवाई करण्यात आल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. त्यातच आता मुंबई विमानतळ कस्टम्स विभागाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये १०.५० कोटीपेक्षा जास्त किमतीचा तस्करीने आणलेला गांजा आणि २३ लाखांचे सोने जप्त केले आहे. कस्टम्स सूत्रांनुसार, गुप्त माहितीच्या आधारे बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाला रोखले. त्याच्या सामान तपासणीदरम्यान त्यांनी अनेक किलो गांजा जप्त केला, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे १०.५० कोटी आहे.
प्रवाशाच्या चेक-इन ट्रॉली बॅगमध्ये हा अवैध माल लपवण्यात आला होता. नार्कोटिक ड्रग्ज अँड ड्रग्ज कायद्याच्या तरतुदीनुसार प्रवाशाला अटक केली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात, प्रोफाइलिंगच्या आधारे, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी मस्कतहून येणाऱ्या एका प्रवाशाला रोखले.
संबंधित प्रवाशाच्या वैयक्तिक झडतीदरम्यान कस्टम अधिकाऱ्यांना एक २४ कॅरेट सोन्याचे ब्रेसलेट आणि एक २४ कॅरेट कच्च्या सोन्याची साखळी सापडली, ज्यांचे एकूण वजन २०० ग्रॅम होते आणि त्यांची किंमत २३.५४ लाख आहे. प्रवाशाने हे सोने त्याच्या अंगावर लपवून ठेवले होते. मात्र, कस्टम विभागाने यावर कारवाई करत संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतले.