पुणे: अमली पदार्थ विरोधी लढा तीव्र करण्यासाठी अमली पदार्थ विक्रीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ड्रग्जमुक्त युवा पिढीसाठी शिवाजी रायगड स्मारक मंडळ, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनांच्या वतीने कोथरुड मधील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले की, कोथरुड मधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. सांगली सारख्या जिल्ह्यातही अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री नात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती पुरविल्यास त्यास वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये १० हजारांचे बक्षीस दिले जात आहे. कोथरुड मध्येही अमली पदार्थांची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करणाऱ्यास बक्षीस देऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
अमली पदार्थ विक्रेत्यांना पुण्यात थारा मिळू देणार नाही, असा स्पष्ट इशारा देऊन ते पाटील पुढे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी मला प्रचंड रोषाचा सामना करावा लागला होता. पण मी कुठेही मागे हटलो नाही, अशी आठवण त्यांनी करुन दिली. तसेच, व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी लोकसहभागातून कोथरुड मध्ये समुपदेशन केंद्र सुरू केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
झिरो टॉलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण असल्याची भूमिका पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी यावेळी मांडली. अमली पदार्थ ही आपल्या तरुण पिढीला उद्ध्वस्त करत आहे. यावेळी उपस्थित सर्वांनी अमली पदार्थ विरोधासाठी शपथ देखील घेतली.
मध्यवर्ती भागातून 11 लाखांचे मॅफेड्रॉन जप्त
पुण्याच्या मध्यभागातून एका सराईताला पकडून पुणे पोलिसांनी नंतरच्या तपासातून एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघड केलेले असताना आता नाना पेठेतून मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. छापेमारीत त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचे एमडीसह इतर असा १३ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Pune Crime: पुणे पोलिसांची धडक कारवाई; मध्यवर्ती भागातून 11 लाखांचे मॅफेड्रॉन जप्त
अदीब बशीर शेख (२९, रा. नाना पेठ), यासीर हशीर सय्यद (३०, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात ड्रग्ज सप्लायरचे जाळे मोठ्याप्रमाणात वाढले आहे. या सप्लायरवर पुणे पोलिसांची नजर असली तरी ग्राहकांपर्यंत ड्रग्ज पोहच होत असल्याचेही दिसून आलेले आहे. यापार्श्वभूमीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त व पेट्रोलिंग करत होते.