
Crime News: कोकण टास्क फोर्सची धडक कारवाई; तब्बल 55 कोटी 88 लाखांचे ड्रग्स केले उद्ध्वस्त
बंगळूरमधील 3 एमडी ड्रग्सचे कारखाने उध्वस्त
कोकण टास्क फोर्सचे सर्वत्र होतेय कौतुक
बंगळुरू येथे कारखाने असल्याची मिळाली माहिती
सावन वैश्य/नवी मुंबई: वाशीतील रहिवासी भागात एक इसम अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच, अमली पदार्थ टास्क फोर्सच्या कोकण पथकाने एका संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याजवळून जवळपास, दीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. अटक केलेल्या रोपी अब्दुल कादर राशीद शेख याच्या जवळून चौकशी करून त्या आधारावर, बंगळूरमधील 3 एमडी ड्रग्सचे कारखाने उध्वस्त केले असून, यामध्ये तब्बल 55 कोटी 88 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 31 डिसेंबर पूर्वी केलेल्या या कारवाईमुळे कोकण टास्क फोर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यात अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य ची स्थापना केली आहे. याची राज्यात सध्या 6 ठिकाणी विभागीय कृती कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाच्या कोकण फोर्स ने 21 डिसेंबर रोजी वाशी गाव परिसरात अमली पदार्थांची विक्री करणारा आरोपी अब्दुल शेख याला अटक करून, जवळपास दीड कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल हस्तगत केला होता.
पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत बंगळूर येथे त्याचे कारखाने असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एमडी ड्रग्स बनवणारा बेळगाव मधील रहिवासी प्रशांत यल्लाप्पा पाटील याला निष्पन्न करून अधिक तपास केला असता, प्रशांत पाटील याच्या बंगळूर येथील 3 कारखान्यात एमडी ट्रक बनवले जात असल्याची माहिती मिळाली. तसेच बंगळूरमध्ये ड्रग्सची विक्री करणारे सुरज रमेश यादव व रामलाल बिश्नोई यांची नावे समोर आल्यावर पोलिसांनी आधी सुरज यादव व रामलाल बिश्नोई या दोघांना अटक केली.
Crime News: रत्नागिरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी; तब्बल 181 किलो ड्रग्स केले नष्ट
सुरज व रामलाल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर कोकण टास्क फोर्सने बंगळूर शहरातील स्पंदना लेआउट कॉलनी, एनजी गोलाहळी भागातील आर जे इव्हेंट नावाची फॅक्टरी, तसेच यरपनाहळी कन्नूर, येथील लोकवस्तीमध्ये असलेल्या एका घरात छापा मारून 4 किलो 100 ग्रॅम एमडी ड्रग्स, तसेच द्रव स्वरूपातील 17 किलो एमडी ड्रग असे एकूण 21 किलो 400 ग्रॅम एमडी ड्रग्स बनवण्याचे साहित्य, असा एकूण 55 कोटी 88 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तीनही कारखाने अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोकण पथकाने उध्वस्त केले आहेत.
नशा मुक्त नवी मुंबईची मोहीम थंडावली….?
नशा मुक्त नवी मुंबई मोहिमेसाठी नवी मुंबई पोलीस सुप्रसिद्ध कलाकारांना बोलावतात. नशा मुक्ती बाबत सोशल मीडियावर जनजागृती करतात. रोज नशीली पदार्थांचे सेवन करणाऱ्या वर कारवाईचा देखावा देखील करतात. मात्र अमली पदार्थांचा पुरवठा व विक्री करणाऱ्यांच्या मुळावर घाव का घालत नाहीत असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. 31 डिसेंबरच्या काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोकण कृती पथकाने केलेल्या या कारवाईमुळे, त्यांच्या बाबत नागरिकांच्या मनात विश्वास दृढ होताना दिसून येत आहे.