
कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल 'इतके' कर्मचारी असणार तैनात
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मंगळवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी २०२६ तारखेला देशभरातील अनुयायी उपस्थिती लावत असतात. त्यामुळे येथे लाखोंची गर्दी होते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच अनुयायी यांना कोणताही त्रास होणार यासाठी योग्य नियोजन व बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
यंदा विजयस्तंभ अभिवादनसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक गर्दी होण्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली असून, वाहनांना पार्किंग, वाहतूक बदल आदींचे नियोजन केले आहे. बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकार्यांसह जवळपास ५ हजार कर्मचारी असणार आहेत. तसेच, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व एनडीआरएफ पथके सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत.
असा आहे बंदोबस्त
वरिष्ठ पोलिस अधिकारी – ३३
पोलिस अधिकारी – ३३२
पोलिस अंमलदार – ३ हजार १०
होमगार्ड – १ हजार ५००
एसआरपीएफ – ४ तुकड्या
बीडीडीएस पथके
क्यूआरटी पथके
इथे असेल पार्किंगची व्यवस्था
कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या अनुयायांसाठी मोठ्या प्रमाणात पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. वक्फ बोर्ड पार्किंग २००, टोरंटो पार्किंग १६० आणि इनामदार पार्किंग इथे ४० मिनीबस बसतील, असे नियोजन आहे. याशिवाय ठिकठिकाणी मोकळ्या जागेवर पार्क होणाऱ्या वाहनांच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
कोरेगाव भिमा परिसरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कंट्रोलरूमद्वारे बंदोबस्तावर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, ड्रोन, सीसीटीव्ही, पीए सिस्टीम, वॉच टॉवर, पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. यंत्रणा कार्यरत राहणार असून नागरिकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. – संदीप सिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण.