सौजन्य फोटो - सोशल मिडीया
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनात खासदारांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्याविरोधात ११ विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरातही उमटले. भाजपच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. माजी आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आरोपी खासदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, तसेच पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. खासदार डॉ. अंगोमचा बिमोल यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. एका लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचे आरोप होणे गंभीर असल्याचे सांगत काँग्रेसने या प्रकरणात तातडीने भूमिका स्पष्ट करून कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपांची सत्यता आणि प्रकरणातील पुढील तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.






