लिपिकाचा धारदार शस्त्राने खून
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता अमरावतीच्या बडनेरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली. बडनेरा जुनी वस्ती स्थित तिलकनगर परिसरातील रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
अतुल ज्ञानदेव पुरी (वय ४२, रा. पुंडलिक बाबा नगर, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा स्थित पुंडलिक महाराज महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. अतुल यांना रस्त्यात अडवून, त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या करून, आरोपी पसार झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणात बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अतुल हे दररोज आपल्या दुचाकीने सकाळी 7 वाजता महाविद्यालयातील कर्तव्य बजावण्यासाठी निघत होते. ते आपली दुचाकी बडनेरा रेल्वेस्थानकावर ठेऊन, ते पुढील प्रवास रेल्वेने करत नांदुरा येथील महाविद्यालयात कर्तव्यावर जात होते. अशातच शुक्रवारी ते सकाळी दुचाकीने घरून निघाले होते. त्यानंतर तिलकनगर परिसरातील जोंधळेकर लॉन्स शेजारील रस्त्याच्या कडेला पडलेला आढळला. त्यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्यावर शस्त्रांनी हल्ला केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी बडनेरा पोलिसांना दिली. त्यानंतर बडनेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मृतदेहावर गंभीर जखमा व धारदार शस्त्राचे घाव आढळून आले. त्यामुळे ही घटना अपघात नसून खून करून मृतदेह रस्त्यावर फेकला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
अपघाताचा केला गेला बनाव
अपघाताचा बनाव करून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासातून दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण पसरले असून, मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलिस करत आहेत.
खुनाचा गुन्हा दाखल
या घटनेच्या माहितीवरून घटनास्थळी सहायक पोलिस आयुक्त कैलास पुंडकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण तसेच बडनेरा पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी पाहणी करून पुरावे ताब्यात घेतले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.