लाचखोर भू-करमापक एसीबीच्या जाळ्यात
लोणार : प्लॉटची आखणी आणि मोजणी करण्यासाठी सुमारे 80 हजार रुपये लाचेची मागणी करणारा लोणार येथील एक भू-करमापक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. उमेश पंडितराव सानप (वय 39) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. लाचेचा पहिला हप्ता 60 हजार रुपये स्वीकारताना सानप याला रंगेहात पकडण्यात आले.
हेदेखील वाचा : अंद्धश्रद्धेतून हत्या? ऊसाच्या शेतात महिलेचं शीर धडापासून वेगळं, मृतदेहाशेजारी लिंबू मिरची आणि हळद कुंकू
उमेश सानप हा लोणार येथील उपअधीक्षक तालुका भूमिअभिलेख कार्यालयात भू-करमापकपदी कार्यरत आहे. त्याचे निवासस्थान लोणार शहरातील खटकेश्वर नगरमध्ये आहे. तक्रारदाराच्या प्लॉटची आखणी आणि मोजणी लवकरात लवकर करून देण्यासाठी भू-करमापक सानप याने संबंधित तक्रारदाराला 80 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच देण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावतीचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे तसेच पोलिस निरीक्षक रमेश पवार, सहायक फौजदार श्याम भांगे, हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी, पोलिस नाईक विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोलिस कॉन्स्टेबल रणजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, चालक नितीन शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी उमेश सानप याच्याविरोधात लोणार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला अन् अधिकारी अडकला
सानप लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. 17) सायंकाळच्या सुमारास लोणार बस स्थानकासमोरील माऊली गजानन होटेलमध्ये सापळा रचला. तक्रारदार रक्कम पहिला हप्ता सानपकडे घेऊन आला. सानप याने ही लाचेची रक्कम स्वीकारली. याच क्षणी त्या ठिकाणी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सानप याच्यावर झडप टाकली. सानपला रंगेहात पकडण्यात आले.
हेदेखील वाचा : Kolkata Doctor Case: अखेर न्याय मिळाला! आरजी कार अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाने दिला निर्णय