
Cyber criminals rampage in Mumbai; Doctors, senior citizens and government officials targeted
Mumbai Cyber Crime News: मुंबईमध्ये सायबर फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले असून, लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत. मुंबईत दाखल झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी एक डॉक्टर, एक ज्येष्ठ नागरिक महिला आणि एका सरकारी अधिकारी अशा तिघांकडून ४.८९ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर क्रिकेट सामन्याचे तिकीट विकणे, सीबीआय अधिकारी बनून पैसे रिफंडचे सांगत फसवणूक करणे आणि नकली कस्टमर केअर कॉल करणे अशा वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या आहेत. या तिन्ही प्रकरणातील पीडितांनी सायबर हेल्पलाइन १९३० तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिस मोबाइल नंबर, बँक अकाउंट आणि सोशल मीडिया डिटेल्सचा वापर करून आरोपींचा तपास करीत आहेत.
अंधेरीतील एक ६६ वर्षीय महिलाही सायबर गुन्हेगारांची शिकार ठरली आहे. १ मार्च रोजी सकाळी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण सीबीआय आफिसर असल्याचे सांगितले. त्याने धमकी दिली की, जर त्यांनी त्वरित पैसे पाठवले नाहीत, तर त्यांना अटक केली जाईल. धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने त्या दिवशी २०,००० ट्रान्स्फर केले. ४ मार्च रोजी आरोपीने पुन्हा फोन करून आणखी पैसे मागितले. भीतीने महिलेने पुन्हा वेगवेगळ्या वेळी २२ हजार, ५ हजार, ४६ हजार, १४ हजार आणि तीन हजार रुपये पाठवले. असे एकूण १०० लाख १० हजार रुपये त्यांनी त्या आरोपीला पाठवले.
अंधेरी पूर्वमध्ये राहणारी ५६ वर्षीय महिला महाराष्ट्र सरकारच्या रेशनिंग विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका ऑनलाइन अॅपवरून किराणा सामान मागवले होते. चुकून त्यांच्याकडून दोन वेळा पेमेंट केले गेले. रिफंडसाठी त्यांनी
गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च केला. त्यावेळी त्यांना दिसलेल्या नंबरवर फोन केला, मात्र तो फ्रॉड निघाला. या महिला अधिकाऱ्याने २,०००, २,०००, ४,१२२, ७०,०००, २,००० आणि १,३०० असे एकूण ८१ हजार ४२२ रुपये ट्रान्स्फर केले.
विलेपार्ले पूर्व येथे राहणाऱ्या एका डॉक्टरने इंस्टाग्रामच्या माध्यमातून भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्याचे तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते सायबर गुन्हेगारांचे शिकार ठरले. डॉक्टरांना स्काय इवेंट्स एंटरप्राइजेज नामाने एक इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट दिसली. यामध्ये भारत-इंग्लंड सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीची जाहिरात देण्यात आली होती. चार तिकिटे खरेदी करण्यासाठी संपर्क साधल्यानंतर आरोपीने पेमेंटसाठी एक यूपीआय क्यूआर कोड पाठवला. सुरुवातीला डॉक्टरने १४,४०० रुपये पाठवले. नंतर तिकीट कन्फर्मेशन आणि रिफंड प्रोसेसिंगच्या बहाण्याने आरोपीने पुनः पुन्हा पैसे मागितले. यादरम्यान डॉक्टरने २८,८००, ७९,५००, १,१०,००० आणि ५७,२०० ट्रान्सफर केले. या प्रकरणात त्यांनी एकूण २,९८,३०० रुपये गमावले आहेत.