
सायबर ठगबाजांकडून २ वृद्धांना गंडा
नागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी गुंतवणुकीवर बक्कळ नफा आणि सीबीआयच्या नावाने डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन शहरातील दोन वृद्धांना जवळपास १ कोटी ४२ लाख रूपयांचा गंडा घातला. याप्रकरणाची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत धंतोली पोलिसांनी ६१ वर्षीय वृद्धाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. तर दुसऱ्या पीडिताने सायबर पोलिसात तक्रार केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ८४ मोबाईल फोनधारकांविरुद्ध फसवणूक आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपींचे मोबाईल नंबर आणि बँक खात्यांच्या आधारावर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित ६१ वर्षीय वृद्ध हे पूर्वी परदेशात काम करत होते. निवृत्तीनंतर ते भारतात परतले. सप्टेंबर महिन्यात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याशी संपर्क केला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास बक्कळ नफ्याचे आमिष दाखविले.
वृद्धाला जाळ्यात ओढल्यानंतर आरोपींनी त्यांना एक लिंक पाठविली आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपशी जोडले. त्या ग्रूपमध्ये अनेक लोक होते, जे त्यांना होत असलेल्या फायद्याचाबत माहिती देत होते. पीडित वृद्धाला विश्वास बसला. त्यांनी हळूहळू १ कोटी ८ लाख रुपये आरोपींकडे गुंतविले. आरोपी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर एका बनावट अॅपवरील खात्यात ४ कोटी रुपयांचा नफा दाखवत होते. मात्र, पीडिताने जेव्हा ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी विविध कारणं सांगून टाळाटाळ करू लागले.
नंतर संपर्क तोडला अन्…
काही दिवसानंतर आरोपींनी त्यांच्याशी सर्व संपर्क तोडले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी धंतोली ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण सायवर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
मनी लाँड्रिंगच्या नावावर उकळले ३३.८० लाख
दुसऱ्या प्रकरणात, सायबर गुन्हेगारांनी एका ७० वर्षीय वृद्धाला जाळ्यात अडकवून ३३.८० लाखांचा चुना लावला. सायबर गुन्हेगारांनी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून दिल्लीच्या आयसीआयसीआय बँकेत वृद्धाच्या नावाने खाते असून त्या खात्याचा उपयोग मनी लाँड्रींगसाठी झाल्याची माहिती दिली. संदीप नावाच्या साथीदारासोबत वरिष्ठ नागरिकांच्या अवयवांची तस्करी व बाळ विक्री रॅकेटमध्ये सामील असल्याचा त्यांच्यावर आरोप करून अटक करण्याची धमकी दिली.
अटकेचे वॉरंट जारी केल्याची धमकी…
तसेच सीबीआयने त्यांना अटक करण्यासाठी वॉरंट जारी केल्याचीही माहिती दिली. यामुळे घाबरून पीडित वृद्ध आरोपींच्या जाळ्यात अडकले. आरोपींनी ५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्याकडून ३३ लाख ८० हजार रुपये उकळले. वृद्धाने स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यात असलेले सर्व पैसे आरोपींना दिले. त्यानंतरही आरोपी त्यांना पैशांसाठी धमकी देत होते. पीडित वृद्धाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.