Cyber Crime: पुण्यात नेमकं काय चाललंय? सायबर चोरट्यांचा तरुणाला 75 लाखांचा गंडा, पोलिसांचा तपास सुरू
पुणे: सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवत नागरिकांची फसवणूक करत असून वेगवेगळ्या घटनेत तब्बल ७५ लाख रुपयांची रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची २५ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ३९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार कोथरूड भागात राहण्यास असून, ते खासगी नोकरी करतात. चोरट्यांनी त्यांना मोबाइलवर संपर्क साधला. फिनवेस्ट कंपनीतून बोलत आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. विश्वास संपादन केल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानूसार, तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम दिली. मात्र, नंतर पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले. तेव्हा तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.
घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याचे आमिष दाखवून विश्रांतवाडी येथील महिलेची ४२ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याबाबत ३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारादर महिलेच्या मोबाइलवर चोरट्यांनी १५ ऑक्टोबर रोजी मॅसेज पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगला पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी बँक खात्यात पैसे जमा करुन घेतले. नंतर महिलेला परतावा दिला नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील चोरट्यांनी ६ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चोरट्यांवर गु्न्हा दाखल केला असून, वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.
कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक
कुरिअरद्वारे पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी बिबवेवाडीतील महिलेची तीन लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात ४२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदारांना अज्ञाताने फोनकरून कुरिअर कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. तुमच्या पार्सलमध्ये पाकिटात अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून त्यांना भिती दाखवली. नंतर त्यांना बँक खाते पडताळावे लागेल असे सांगत बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.
‘वर्क फ्रॉम होम’च्या बहाण्याने तरुणाची तब्बल २७ लाखांची फसवणूक
वर्क फॉर्म होम पद्धतीने काम मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वाघोलीतील तरुणाची २७ लाख ४६ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. त्याला ऑनलाइन टास्क दिला होता. नंतर पुन्हा टास्क देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण केसनंद परिसरात राहायला आहे. ४ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी तरुणाला मोबाइलवर संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले.