दहशतीचा नवा पॅटर्न; फट-फट ठो! पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकतोय
पुणे/अक्षय फाटक : पुण्याच्या गुन्हेगारीचा अन् गुन्हेगारांचा ‘पॅटर्न’ सर्व सामान्यांवर दहशत माजवत आहे. कोयता, पिस्तूल अन् वाहन तोडफोड दहशतीचे माध्यम होत असतानाच आता आणखी एक नवा पॅटर्न पाहायला मिळत आहे. या नव्या पॅटर्नमुळे मात्र, पुणेकरांची ‘झोप’ उडवली आहे. ”फट-फट ठो”चा आवाज काढत हे नवखे दहशतीचा माहोल निर्माण करत आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. हे टवाळखोर गुन्हेगारांपेक्षाही पुढची दहशत माजवू लागले आहेत. त्यामुळे वेळीच या नवख्यांना वठणीवर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. फक्त सायलेन्सर जप्ती अन् दंडात्मक कारवाई न करता, ठोस व कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख, पॅटर्न आणि दहशत माजविण्याचे प्रकार बदलत-बदलत जात आहेत. काळानुसरूप त्याचे स्वरूप बदलताना दिसत आहे. गुन्हेगारीच्या या स्वरूपामुळे असुरक्षित पुणे अशी ओळखही निर्माण झाली आहे. हे प्रयत्न सुरू असताना आता नव्या दहशतीचे आवाहन पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवावा असा आवाज काढत ‘बुलेट राजा’ रात्री अपरात्री शहरात ‘घिरट्या’ घालत फिरत आहेत. फटफट करून सुसाट गाडी पळवायची अन् अचानक स्फोट झाल्यासारखा ‘ठो’ असा आवाज काढायचा. हा आवाज इतका कर्णकश व भितीदायक असतो की नागरिकांच्या काळजाचा ठोकाच चुकतो.
सायलेन्सरवर बुलडोझर पण..
पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने अशाच प्रकारे आवाज काढणाऱ्या सायलेन्सरवर सातत्याने कारवाई करून तब्बल १७६८ सायलेन्सर नष्ट केले होते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली होती. पोलिसांच्या या कारवाईचा मात्र, या टवाळखोर व बुलेट रांजाना फरक पडत नसल्याचे दिसत आहे. शहरात रात्री अपरात्री फट-फट ठोका आवाज निगतच आहे.
उत्सवाचा आनंदोत्सव की भितीचे वातावरण
शहरात एखाद्या उत्सवाचा आनंदोत्सव साजरा करताना देखील अशाच पद्धतीने गाड्यांचे आवाज काढत सुसाट गाड्या दामट्याला जातात. क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर देखील उत्साही तरूण विनाकारण वाहतूकीचे नियम मोडत कोंडी तर निर्माण करतातच पण ट्रिपलशीट आणि गाड्यांचे आवाज काढत शहरभर भिर्र-भिर्र फिरत असल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास हा सर्व सामान्यांना होत असल्याचे दिसते.
गॅरेज चालकांसह वाहन मालकांवरही कारवाईची अपेक्षा
बुलेट या दुचाकींना हे मॉडिफाय सायलेंन्सर बसविलेले असतात. गॅरेज चालकांकडून काही पैसे देऊन ते मॉडीफाय केले जातात. त्यामुळे अशा गॅरेज चालकांवर देखील कारवाई होण्याची गरज आहे. त्यासोबतच गाडी मालक म्हणजेच पालकांवर देखील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत.
स्थानिक पोलिसांचेही लक्ष हवे
स्थानिक पोलिसांकडून अशा टवाळखोरांवर नजर असणे गरजेचे आहे. कोण गॅरेज चालक, हे टवाळ कोण याची माहिती सहसा पोलिसांना असते. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातूनच हे तरूण रात्री अपरात्री फेरफटका मारतात. त्यामुळे फ्कत वाहतूक पोलिसांकडूनच नव्हे तर स्थानिक पोलिसांनी देखील लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.