crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूचा वेष धारण करून रस्तालूट करणाऱ्या पाच दरोडेखोरांना धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. साधूच्या वेशात असलेल्या व्यक्तीने आधी महिलांना गाडीतून बाहेर उतरवलं त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडचे सर्व सोने काढून घेतले.
नेमकं काय घडलं?
21 ऑगस्ट रोजी ललिता पाटील (३८, रा.खाचणे, चोपडा जि.जळगांव) आणि त्यांचे नातलग पंढरपूर, तुळजापूर आणि जेजुरी असे देवदर्शन करून माळेगावातून धुळ्याकडे येत असतांना लळींग घाटात (ता. धुळे) भरदुपारी अडीच वाजता एक अनोळखी व्यक्ती साधुच्या वेशात त्यांच्या वाहनाला आडवा झाला.
चालक भगवान पाटील यांनी वाहन थांबवताच साधूच्या वेशातील व्यक्तीने “मुझे पिनेके लिये पाणी दो, और गाडीसे उतरकर मेरा आशीर्वाद लो” असे सांगितले. यामुळे वाहनातील सर्वजण खाली उतरले. त्यांनी साधुच्या वेशातील व्यक्तीचे पाय धरले त्यांनतर साधूने ललिता पाटील यांच्या आई सुनंदाबाई, चुलतसासू सरलाबाई यांना गाडीबाहेरच थांबण्यास सांगितले आणि बाकीच्यांना गाडीत बसण्यास सांगितले. सर्वजण वाहनात बसल्याची खात्री होताच त्याने अचानक त्याच्या कमरेला असलेला चाकू काढला. धाक दाखवून “आप के पास का सोना जल्दी निकालके दो, नहीं तो आपको जानसे मार दूंगा” अशी धमकी दिली.
वाहनाबाहेर अचानक चालू झालेला थरार पाहून सर्व प्रवासी घाबरले. चाकूने वार करेल या भीतीने महिलांनी त्यांच्या अंगावरील दागिने निमूटपणे काढून दिले. सुनंदाबाईने तिच्या गळ्यातील सात ग्रामची वजनाची सोन्याची मणीमाळ, तीन ग्रॅमचे कानातील दागिने आणि सरलाबाई यांनी त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची माळ असे एकूण एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने त्याला काढून दिले. याप्रकरणी ललिता पाटील यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर २४ ऑगष्ट रोजी गुन्हा दाखल झाला.
आरोपींना कशी केली अटक
सोमवारी सकाळी नऊ वाजता गरताड (ता.धुळे) गावाच्या पुढे असलेल्या गरताड बारीजवळ साधूच्या वेशातील व्यक्ती रस्त्याने पायी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर साध्या वेशातील पोलीस तेथे पोहोचले. साधूच्या वेशातील व्यक्तीला त्याचे नांव, गांव विचारले असता त्याने जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (२३, रा.घेसुपुरा, सफेरा बस्ती, रोशनाबाद, हरिव्दार) असे त्याने सांगितले. पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. अधिक विचारपुस केली असता त्याने व त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने लळींग (ता.धुळे) शिवारात गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली.
गोविंदनाथ नाथसफेरे (२५), सौदागर नाथसफेरे (२५), विक्की नाथसफेरे (२३), क्रांता नाथसफेरे (२५) सर्व रा. घेसुपुरा, सफेरा बस्ती, ता. रोशनाबाद जि. हरिव्दार (उत्तराखंड) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. हे सर्वजण साधूचा वेश धारून करून रस्त्यावर लुटमार करीत असल्याची कबुली त्याने दिली. यामुळे मुख्य संशयित जागीरनाथ नाथसफेरा याच्यासह पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले.