
लाईक्सच्या नादात जीवघेणा स्टंट; पाण्याचा अंदाज चुकला अन् ३० फूट उंचीवरून उडी मारणे पडले महागात
मित्रांसोबत धरणावर गेला
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पेंद्र रविवारी आपल्या मित्रांसोबत पहूज धरणावर फिरण्यासाठी गेला होता. धरणावर पोहोचल्यानंतर रील बनवण्यासाठी त्याने धोकादायक स्टंट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण भिंतीवरील रेलिंगवर चढून त्याने थेट धरणाच्या पाण्यात उडी मारली. मात्र, उडी मारताना पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज त्याला आला नाही.
खडकावर आदळला
पुष्पेंद्र पाण्यात पडताच तळाशी असलेल्या कठीण भागावर जोरात आदळला. या धडकेत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आणि दोन्ही पायांची हाडे फ्रॅक्चर झाली. पायांना दुखापत झाल्याने त्याला पाण्यात पोहणे किंवा स्वतःला पुढे नेता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही क्षणांतच तो बुडण्याच्या स्थितीत पोहोचला.
🚨 YOUTH BREAKS BOTH LEGS WHILE FILMING REEL A 32-year-old man reportedly jumped from around 30 feet into Pahuj Dam in Jhansi, Uttar Pradesh while attempting to film a video reel on Sunday evening. Instead of landing in deeper water, he fell onto a shallow, rocky surface,… pic.twitter.com/B4BNYHjLtX — contentkikamii (@contentkikamii) September 7, 2026
हातांच्या मदतीने वाचला
दोन्ही पाय निकामी झाल्यानंतरही पुष्पेंद्रने प्रसंगावधान राखले. त्याने केवळ हातांच्या मदतीने पाण्यावर तरंगत राहण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मित्रांसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा संपूर्ण प्रकार त्याच्या मित्रांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. उडी मारण्यापूर्वी मित्रांमधील संवादही व्हिडिओमध्ये ऐकू येत असल्याची माहिती आहे.
एका पायावर शस्त्रक्रिया
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पुष्पेंद्रला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. एका पायावर तातडीने शस्त्रक्रिया करून लोखंडी रॉड बसवण्यात आला आहे. दुसऱ्या पायावरही शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
धोकादायक स्टंटपासून सावध राहण्याची गरज
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणांकडून धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, अशा स्टंटमध्ये क्षणभराचा चुकीचा अंदाजही जीवावर बेतू शकतो. पहूज धरणातील या घटनेने पुन्हा एकदा रील आणि व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावरील काही सेकंदांच्या प्रसिद्धीपेक्षा स्वतःचा जीव आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.