सौजन्य फोटो - सोशल मि़डीया
गोंगाटावरून वाद झाल्याचा दावा
रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चोंगथम विक्रम सिंह आपल्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून कचरा टाकण्यासाठी खाली आले होते. त्यावेळी जवळील रस्त्यालगतच्या एका खानावळीतील काही कर्मचारी गोंधळ करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सिंह यांनी या गोंगाटाला आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्यात आणि तेथील काही व्यक्तींमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते. वादानंतर सिंह घराकडे परतत असताना संबंधित गटाने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. आरोपींनी तिसऱ्या मजल्यापर्यंत त्यांचा पाठलाग करून कॉरिडॉरमध्ये त्यांना गाठले आणि मारहाण केल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पसार झाल्याचे सांगण्यात येते.
सीसीटीव्हीत आठ जण कैद
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या फुटेजमध्ये आठ जण इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत असल्याचे सांगण्यात येते. हे फुटेज कथित हल्ल्यानंतरचे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांना सोमवारी पहाटे १ वाजून ३८ मिनिटांनी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर सिंह यांचा २० वर्षीय मुलगा याइफाबा याने त्यांना ओखला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा मृत्यू झाला. चोंगथम विक्रम सिंह हे पत्नी जोशना चोंगथम आणि मुलगा याइफाबा यांच्यासह राहत होते. या हल्ल्यामागील नेमके कारण आणि सर्व आरोपींची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






