पुण्यात पुन्हा 'ड्रंक अँड ड्राईव्ह'; भरधाव कारने अनेक वाहनांना उडवलं, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच थेट... (संगहित फोटो)
पुणे : मद्यधुंद कारचालकाने वारजे माळवाडी परिसरात चांगलाच धुमाकूळ घालत चार ते पाच वाहनांना उडवले. धक्कादायक म्हणजे, नंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाच्याच अपहरणाचा प्रयत्न केला. याप्रकरणी कारचालकाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.
संजोग सुरेश माने (वय ३०) असे ताब्यात घेतलेल्या कारचालकाचे नाव आहे. संबंधित चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजास शिवाजीनगर येथे जात होते. यावेळी खासगी प्रवासी वाहतूक करणारी एक कार शिवणेवरून वारजे माळवाडीकडे भरधाव वेगात निघाली होती. या कारने मार्गात काही वाहनांना धडक दिली. पण न थांबता कार पुढे निघून गेली असल्याचे त्यांना समजले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षीरसागर यांनी तत्काळ संबंधित कारचा पाठलाग केला.
वारजे चौकाजवळ मद्यधुंद कारचालकाने एका टेम्पोला धडक देत नुकसान केले. यावेळी क्षीरसागर यांनी धाडसाने या कारला ओव्हरटेक करत थांबविले. तेथे जवळ असणाऱ्या वारजे माळवाडी वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी यांना आवाज देऊन मद्यधुंद कारचालकाला चौकीत घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र, वाहतूक पोलिस कर्मचारी कारमध्ये बसल्यानंतर चालकाने अचानक कार वेगाने पुढे चालवत पोलिस चौकीकडे न जाता बेधडकपणे वाहन चालवण्यास सुरुवात केली. काही क्षणांसाठी कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
पोलिसांकडून पुन्हा पाठलाग
यानंतर पुन्हा क्षीरसागर यांनी पाठलाग करून संबंधित चालकाला रस्त्यात अडविले आणि चांगलाच चोप दिला. यानंतर मद्यधुंद चालकाला ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पिंपरी-चिंचवड शहरातही अपघाताच्या घटना
पिंपरी-चिंचवड शहरातील बेफाम व अनियंत्रित टिप्पर वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सोमवारी एकाच दिवशी घडलेल्या तीन भीषण अपघातांनी संतापाची लाट उसळली आहे. या अपघातांमध्ये एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बर्ड व्हॅली चौक येथे झालेला अपघात सर्वाधिक धक्कादायक ठरला. भरधाव टिप्परने धडक दिल्याने एका नागरिकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.






