सौजन्य - नवराष्ट्र टीम
रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे महापालिकेने घेतलेली कठोर भूमिका योग्य असल्याचे रवींद्र साळेगावकर यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र केवळ नगरसेवकांवर नजर ठेवून अतिक्रमण थांबणार नाही, तर त्यासाठी जबाबदार असलेल्या क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षक यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
साळेगावकर यांच्या मते, क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काम करणारे अतिक्रमण निरीक्षक दररोज रस्त्यावर फिरत असतात. त्यांच्या भागात कुठे अतिक्रमण झाले आहे, कुठे नवीन बांधकाम सुरू आहे, याची त्यांना पूर्ण माहिती असते. तरीही अनेक ठिकाणी ते डोळेझाक करतात. त्यामुळे अतिक्रमण वाढत जाते आणि नंतर कारवाई करणे अधिक कठीण होते. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक अतिक्रमण आढळेल, त्या कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि निरीक्षक यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.
नगरसेवकांच्या फोनची यादी जाहीर करण्यासोबतच अधिकाऱ्यांचीही यादी जाहीर करावी, अशी मागणी साळेगावकर यांनी केली आहे. पारदर्शकता आल्यास अतिक्रमण करणाऱ्यांना पाठबळ मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. केवळ कारवाई करून उपयोग नाही, तर अतिक्रमण होऊच नये यासाठी रोजच्या देखरेखीवर भर द्यावा लागेल, असंही साळेगावकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Ans: भाजपचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
Ans: अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी आणि अतिक्रमण निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Ans: अतिक्रमणाच्या कारवाईसंदर्भात फोन करणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.






