
Blast News: हॉटेल जगदंबामध्ये सिलेंडरचा स्फोट अन्...; 5 जखमी कामगारांचा उपचारांदरम्यान मृत्यू
सिलेंडर स्फोटात झाले होते जखमी
पाचही परप्रांतीय कामगारांची नावे समोर
दौंड तालुक्यातील दौंड पाटस रोडवर घडलेली घटना
पाटस: दौंड तालुक्यातील दौंड पाटस रोडवर असलेल्या गिरीम हद्दीतील हॉटेल जगदंबामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या बारा कामगारांपैकी पाच कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून, त्यांची अधिकृत नावे दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांनी दिली आहेत. जखमींपैकी गंभीररित्या भाजलेल्या सहा कामगारांना ससून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दीपक भूपसिंग वर्मा (वय २५), मणिराम अत्तरसिंग वर्मा (वय २१), कुकरन कलमसिंग निषाद (वय १४), कन्हैया बंगालीराम वर्मा (वय २०), रामप्रकाश कालीचरण वर्मा (वय २४, सर्व रा. आग्रा जिल्हा, उत्तर प्रदेश) अशी या कामगारांची नावे आहेत. ब्रजमोहन पुरूषोत्तम वर्मा या आणखी एका कामगारावर सध्या उपचार सुरू आहेत. अशी माहिती तपासीय अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री यांनी दिली. हॉटेल जगदंबामध्ये ७ जानेवारीला गॅस सिलेंडरच्या स्फोटाची भीषण दुर्घटना घडली होती. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी या स्फोटात जखमी झालेल्या बारा कामगारांना तातडीने रुग्णालयात हलवले. त्यातील गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना पुण्यातील ससून रुग्णालयात हालविण्यात आले होते.
’10 कर्मचारी भाजले अन् 6 जण…’; दौंडच्या हॉटेल जगदंबामध्ये नेमके घडले काय?
यावेळी घटनास्थळावरून तब्बल २२ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते. त्यापैकी बारा गॅस सिलेंडर हे अवैध घरगुती वापराचे होते. त्यामुळे हॉटेल मालक व व्यवस्थापकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र या दुर्घटनेनंतर दौंड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता उपचारादरम्यान पाच कामगारांचा मृत्यू झाल्याने हॉटेल जगदंबाचे मालक आणि व्यवस्थापकावरील दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमांची वाढ होण्याची शक्यता असूनन पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री पुढील तपास करीत आहेत.
कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक
दरम्यान, बेकायदा आणि विनापरवाना १२ घरगुती गॅस वापरल्या प्रकरणी या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागांनी काय कारवाई केली? हॉटेल कामगारांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना नसणे आणि कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विभागांकडून काय कारवाई झाली? याबाबत मात्र मौन पाळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.